गोड टरबुजाची कडू कहाणी : अपेक्षित दहा लाख;  मिळाले केवळ दीड लाख

file photo
file photo

परभणी : मोठ्या मेहनतीने दोन एकर शेतीत टरबूज पीक घेतले. यंदा कोरोना संसर्गाच्या आगोदर टरबूज पिकाला भाव चांगला भाव होता. त्यात उत्पादनही डोळ्यात भरण्यागत झाले. परंतु, कोरोनाच्या कहराची नजर लागली आणि अपेक्षित दहा लाख रुपयांच्या जागी केवळ दीड लाखावरच समाधान मानण्याची वेळ ईठलापूर (ता., जि. परभणी) येथील टोपाजी कदम या शेतकऱ्यावर आली. निसर्गांच्या या अवकृपेमुळे पुरत्या मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

परभणी शहरापासून अगदी दहा किमी अंतरावर ईठलापूर (दे.) गाव आहे. परभणीकरांना ताजा भाजीपाला याच गावातील शेतकरी पुरवितात. या गावातील पारंपरिक शेतीला छेद देत नवीन वाट शोधणारे शेतकरी टोपाजी कदम (वय ६०) यांचे अख्खे कुटुंबच आठ एकर शेतीवर गुजरान करते. तीन मुलींचे लग्न केल्यानंतर मुलांचाही संसार याच शेतीवर उभा केला. मुलगा बंडू कदम आणि सून रेखा यांच्या मदतीने टोपाजी कदम ऊर्फ तात्या या गावातील नावाजलेले शेतकरी व वारकरीदेखील आहेत. 
टोपाजी कदम यांनी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आठ पैकी दोन एकर जमिनीवर टरबूज पीक घेतले. त्यासाठी त्यांनी ६० हजार रुपयांची बी-बियाणे, उष्णतारोधक मल्चिंग खरेदी करून टरबुजाची लागवड केली. मेहनतीने लागवड केलेल्या टरबुजाला कोंब दिसू लागले अन् टोपाजी कदम यांच्या उतारवयाला नवशक्तीची पालवी फुटू लागली. या पिकातून आता लाखो रुपयांची कमाई होणार असल्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. स्वत: टोपाजी कदम, मुलगा व सून हे तिघेही दिवसरात्र या टरबूज शेतीची मशागत करत होते. औषधी फवारणीवर ७० हजार रुपयांचा खर्च झाला. दोन एकरांचे शेत मोठमोठाल्या टरबुजांनी भरून गेले. पीक एवढं अफाट आलं की कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


कोरोना व अवकाळीने स्वप्न भंगले
टोपाजी कदम यांचे स्वप्न त्याच दिवशी भंगले, ज्या दिवशी कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन झाले. शेतीचे व्यवहार जरी चालू असले तरी व्यापाऱ्यांपर्यंत एवढा माल कसा पोचायचा, असा प्रश्न सतावत होता. ५० टन उत्पन्न डोळ्यासमोर सडण्याची भीती होती. अवकाळी पावसाने टरबुजाच्या खालची जमीन ओली झाली. ओल्या जमिनीवरच्या टरबुजाच्या भागाने नासाडी धरली. तब्बल दहा टन टरबूज शेतातून बाहेर फेकून द्यावे लागले. सडण्यापैक्षा कुणाच्या पोटात जावे, या उद्देशाने चार -चार टरबूज गावातील प्रत्येक घरी फुकटात दिली. कमीत कमी वीस रुपयांना विकणारं टरबूज मातीमोल झाले होते.

टोपाजी तात्याचे व्याही आले धावून
टोपाजी कदम यांच्यावर आलेले संकट पाहून नात्यातील लोकांनी धाव घेतली. त्यांचे व्याही बालासाहेब जाधव (ठोळा, ता. परभणी) हे अशा या कठीण मदतीला धावून आले. टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत, राहिलेल्या टरबूज विक्रीची सोय त्यांनी करून दिली. शेतातील ४० टन टरबुजांची विक्री त्यांनी थेट बांधावरूनच करून दिली. त्यामुळे किमान दीड लाख रुपये तरी त्यांच्या हाती पडले.

महामारीपुढे संकट मोठे नाही
दोन एकर टरबुजाच्या पिकांतू दहा लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु, जेमतेम दीड लाख हाती आले. हे मोठे नुकसान आहे. परंतु, जिथे जगातील माणसे महामारीमुळे संकटात असताना आपले संकट एवढे मोठे नाही.
- टोपाजी कदम, शेतकरी, इटलापूर (ता., जि. परभणी)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com