‘लॉकडाऊन’ने चिमुकला दुरावला आई -वडीलांपासून

कृष्णा पिंगळे
Thursday, 26 March 2020

सोनपेठ (जि.परभणी) येथील तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ कृषी अधिकारी समीर वाळके यांची पत्नी नम्रता वाळके या सातारा जिल्हा परिषदेच्या वळई येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.‘लॉकडाऊन’ने त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अद्वैत हिंगोली येथे आजीकडे राहिला आहे.

सोनपेठ (जि.परभणी) : ‘कोरोना’ वरील कठोर उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता.२५ रोजी रात्री आठ वाजता रात्रीच्या बारा वाजलेपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. तसेच देशातील नागरिकांना जिथे आहेत तिथेच राहण्याचे आवाहन केले. या लॉकडाऊनमुळे व जिल्हाबंदीमुळे एक पाच वर्षांचा चिमुकला मात्र, आपल्या आई वडीलांपासून दुरावला गेला आहे. 

सोनपेठ (जि.परभणी) येथील तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ कृषी अधिकारी समीर वाळके यांची पत्नी नम्रता वाळके या सातारा जिल्हा परिषदेच्या वळई येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी सुट्ट्या असल्यामुळे वाळके दांपत्य आपल्या पाच वर्षांच्या अद्वैत या मुलाला घेऊन हिंगोली येथे आपल्या सासरवाडीस गेले होते. 
परंतु, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी तात्काळ हजर होण्यास सांगितल्यामुळे मुलाला सासरवाडीला ठेऊन मंडळ कृषी अधिकारी समिर वाळके हे सोनपेठ येथे कार्यरत झाले. तर त्यांच्या पत्नी नम्रता वाळके या वळई (जि.सातारा) येथे हजर झाल्या.

हेही वाचा - बॅंक कर्मचाऱ्यांना मिळतो पोलिसांचा ‘प्रसाद’ !

अद्वैत आई वडिलांच्या आठवणीने रडतोय...
 दोनचार दिवसात परिस्थिती निवळेल व आपल्याला मुलांकडे जाता येईल या आशेवर वाळके दांपत्याने मुलगा अद्वैतला हिंगोली येथेच ठेवले व शासकीय कामकाजास सुरुवात केली. परंतु सुरुवातीला शनिवारी परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदचा आदेश काढला तर रविवारी जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. तर सोमवारी दुपारी राज्यसरकारने जिल्हा बंदीचा आदेश काढला. तसेच त्याच दिवशी रात्री पंतप्रधान यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे वाळके दांपत्यापैकी कोणीही आपल्या मुलांकडे पोहोचू शकले नाही. सदरील पाच वर्षांचा अद्वैत हा चिमुकला आपल्या वयोवृद्ध आजी बेबीताई शिरसाठ यांच्यासोबत असून आई वडिलांच्या आठवणीने अहोरात्र रडत आहे. 

हेही वाचा - दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

आईही विरहाने व्याकुळ
तर चिमुकल्याची आई नम्रता वाळके या देखील मुलाच्या विरहाने व्याकुळ झाल्या आहेत. आपल्या पत्नीला घेऊन येण्यासाठी समीर वाळके यांनी अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु जिल्हाबंदीमुळे व पंतप्रधान यांनी जिथे आहेत तिथेच राहण्याचे आदेश दिल्यामुळे कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी याबाबत मदत करत नसल्यामुळे आता या चिमुकल्याची आपल्या आई -वडिलांशी कधी गाठभेट होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Lockdown' by son Durav from his parents A religious guy ....