राज्यात लॉकडाऊनमध्ये ७३ लाख वीजग्राहकांनी भरले १२२७ कोटी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

राज्यातील ७३ लाख वीजग्राहकांनी वीजबिलांचा १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा 'ऑनलाईन' भरणा, नांदेड परिमंडळातील १ लाख ५८ हजार वीजग्राहकांनी भरले २२ कोटी ९१ लाख  

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात 'लॉकडाऊन' असल्याने सर्व प्रकारची वीजबील भरणा केंद्रे बंद आहेत. अशा अवस्थेत सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देत महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरबसल्या मार्च महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा 'ऑनलाईन' वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडळातील १३ लाख ५० हजार तसेच भांडूप परिमंडलातील ११ लाख वीजग्राहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर नांदेड परिमंडळातील नांदेड- एक लाख ५८ हजार वीजग्राहकांनी २२ कोटी ९१ लाख रूपयांचा भरणा केला आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

हेही वाचा - `त्या` परप्रांतीयांना आश्रय देणाऱ्या धार्मिकस्थळ प्रमुखांविरूद्ध गुन्हा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाखांचा भरणा
 
गेल्या मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा केला. यामध्ये परिमंडलनिहाय ग्राहकसंख्या व रक्कम पुढीलप्रमाणे - पुणे– १३.५० लाख – २६६.२९ कोटी, भांडूप– १०.९९ लाख – २३३.६० कोटी, कल्याण– १०.२५ लाख – १६४.३९ कोटी, नाशिक– ५.६५ लाख – ९४.४१ कोटी, बारामती– ५.६३ लाख – ७१.०९ कोटी, कोल्हापूर– ४.२२ लाख – ८४.९६ कोटी, नागपूर– ४.०५ लाख – ७०.७५ कोटी, जळगाव- ३.२५ लाख – ४७.८७ कोटी, औरंगाबाद– २.३० लाख – ४३.७५ कोटी, अकोला– २.२७ लाख – २७.१० कोटी, अमरावती- २.२१ लाख – २३.४८ कोटी, लातूर- १.९२ लाख – २५.५३ कोटी, कोकण- १.८८ लाख – २२.९२ कोटी, चंद्रपूर- १.७९ लाख – १५.३६ कोटी, गोंदिया- १.७९ लाख – १२.८२ कोटी, नांदेड- १.५८ लाख – २२.९१ कोटी.

ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्याची सोय

'लॉकडाऊन'मुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत.

'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे

नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

येथे क्लिक करा -  डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात, मात्र घराघरांतच

भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध

महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in the state has paid 1227 cr 73 lakh electricity consumers nanded news