लॉकडाउन : धान्यासाठी गावकऱ्यांची पायपीट थांबेना! तहसीलदारांच्या आदेशाची होतेय पायमल्ली

शिवचरण वावळे
Wednesday, 29 April 2020

महापालिकेच्या हद्दीपासून जवळच असलेल्या हस्सापूरगावाचे स्वस्तधान्य दुकान बाजुच्या गावातील महिला बचत गटास चालवण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे गावातील नागरीकांची धान्यासाठी फरफट'होत असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हस्सापूरच्या गावकऱ्यांची हेळसाड थांबवण्यासाठी प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी हस्सापूरच्या गावकऱ्यांनी केली जात आहे. 

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हस्सापूरगावचे स्वस्तधान्य दुकान परस्पर नसरतपूरच्या महिला बचत गटाशी जोडले गेले आहे. यामुळे गावातील शेकडो कुटुंबियांना राशन मिळविण्यासाठी गावातून नसरतपूर पर्यंत पायपीट करावी लागत आहे.

‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता केंद्रसरकारने देशात ‘लॉकडाउन’ची घोषणा केलीय. दरम्यानच्या काळात सामान्य जनतेला राशन दुकानामार्फत किमान तीन महिण्यापर्यंतचे धान्य पुरविण्यात येत आहे. नांदेड शहराच्या अगदी उशाशी असलेल्या हस्सापूरगावची लोकसंख्या तीन हजार असताना देखील गावातील स्वस्तधान्य दुकान इतरत्र हलविण्यात आले आहे. परिणामी लॉकडाउनमध्ये गावातील नागरिकांना राशनसाठी दुसऱ्यागावात जावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही गावचे लोक राशनसाठी एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याने समान अंतरचा चांगलाच फज्जा उडताना नसरतपूर येथे दिसून येत आहे 

हेही वाचा -  स्वारातीम विद्यापीठ देतय प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षणातून धडे

तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली

जुन २०१८ मध्ये हस्सापूर येथील रहिवाशांनी गावचे राशनदुकान परस्पर दुसऱ्या गावातील महिला बचत गटास वळते करण्यात आले असल्याची माहिती नांदेडचे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन दिली होती. त्यानंतर संबंधित तहसीलदार यांनी नसरतपूर गावची लोकसंख्या जास्त असल्याने स्वतंत्र स्वस्तधान्य दुकानाची व्यवस्था करण्याचे निर्गमित केले होते. तत्पूर्वी राशन दुकानदाराने एक दिवस हस्सापूर येथे जाऊन राशन वितरीत करावे, असे आदेश सप्टेंबर २०१८ मध्ये निर्गमित केले होते.    

हेही वाचा- धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली १६ वर

दोन वर्षानंतर पुन्हा तहसिलदारास निवेदन

परंतु, दोन वर्ष होऊन गेली तरी, तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या आदेशांचे पालन संबंधित बचत गटाने केल्याचे दिसून येत नाही. हस्सापूर येथील नागरिकांना लॉकडाउनच्या काळात देखील धान्य मिळत नसल्याने व दोन किलोमीटर पायी जाऊनही धान्यासाठी झगडावे लागत आहे. हतबल झालेल्या हस्सापूरच्या नागरिकांनी पुन्हा नव्याने तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत नसरतपूर गावच्या रेणुका महिला बचतगटास दिलेले राशनदुकान विभक्त करण्याची मागणी केली आहे.

राशन गावात मिळण्यासाठी शासनाने नियोजन करावे
सध्या लॉकडाउन असल्यामुळे गावातील शेकडो नागरिकांना स्वस्तधान्य मिळवण्यासाठी आॅटोरिक्षा करुन दुसऱ्या गावात जावे लागत आहे. आणि संबंधित दुकानात समांतर अंतर सुद्धा राखले जात नाही. परिणामी आम्हाला भीती वाटत आहे. कोरोना सारखा आजार नांदेड शहरात आल्यामुळे आता तरी आम्हाला गावातल्या गावात राशन मिळण्यासाठी शासनाने नियोजन करावे, अशी आमची मागणी आहे.
-गोविंद सोनटक्के  नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Tehsildar's Order To Stop Willagers' Pipeline For Foodgrains Nanded News