लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुका रंगणार; सर्वांच्या नजरा आरक्षण आणि प्रभागरचनेकडे

नीळकंठ कांबळे
Wednesday, 20 January 2021

लोहारा नगरपंचायतची मुदत संपत येत आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकपूर्व तयारीला प्रशासनाने सुरूवात केली आहे

लोहारा( जि. उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतची मुदत संपत येत आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकपूर्व तयारीला प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने प्रभाग रचना तयार करणे, त्यावरील हरकती मागविणे, प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करणे यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय हालचालीला वेग येत असून इच्छुकांच्या नजरा नव्याने होणाऱ्या प्रभागरचनेकडे लागल्या आहेत.

लोहारा नगरपंचायतची मुदत ५ मेला संपणार आहे. नगरपंचायत १७ सदस्यांची असून १७ प्रभाग आहेत. लोहाऱ्याला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाच्या इच्छूकांनी मागील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु प्रभाग रचना, आरक्षण कसे राहिल, हे निश्चित नसल्यामुळे सावध पवित्रा घेतला आहे. नगरपंचायतची निवडणूकपूर्व तयारी सुरू झाल्यांने इच्छुकांच्या नजरा आता सोयिस्कर प्रभागरचनेकडे लागल्या आहेत.

'उदगीरची दगडफेक धार्मिक नसून पोलिसांवर हल्ला होता'

प्रभाग रचना करणे, प्रभागामध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागेचा चक्रानुक्रमे फिरवणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे, अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे याबाबतचा कालबध्द कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यनुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरून लोकसंख्या, क्षेत्र, सिमांकन, नकाशा, अनुसूचीत जाती, जमाती, ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे १ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीला प्रभागातील सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. २५ फेब्रुवारीला प्राप्त हरकती वसूचनांवर जिल्हाधिकारी सुनावणी करतील. त्यानंतर संबंधित आयुक्त ५ मार्चला अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. ९ मार्चला जिल्हाधिकारी व नगरपंचायतच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lohara nagar panchayat election usmanabad political news