'उदगीरची दगडफेक धार्मिक नसून पोलिसांवर हल्ला होता'

युवराज धोतरे
Wednesday, 20 January 2021

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन उपस्थित होते. 

उदगीर (लातूर): उदगीर शहरात ठिकठिकाणी मंगळवारी (ता.१९) झालेली दगडफेक धार्मिक उद्देशाने नसून तो पोलिसांवरील हल्ला होता. शहरातील वातावरण खराब करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असून तो पोलिसांनी वेळीच हाणून पाडला अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.२०) सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन उपस्थित होते. श्री पिंगळे म्हणाले, हैबतपुर (ता.उदगीर) येथील युवकास तोडणार येथे मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यास दवाखान्यात दाखल करण्यात आले. याची एमएलसी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येतात त्या दिवशीपासून ते गुन्हा दाखल होईपर्यंतचा घटनाक्रम हा योग्य प्रकारे हाताळला गेला आहे.

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर - कारचा भीषण अपघात

१७ जानेवारी रोजी फिर्यादीचा भाऊ ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी या युवकाचा मृत्यू झाला. या संधीचा फायदा घेत काही जणांनी हा मृतदेह पोलिस ठाण्यात घेऊन येणे, पोलीस ठाण्यासमोर दगडफेक करणे व शहरातील ठिकठिकाणी दगडफेक करून नागरिकांना जखमी करणे हा एक जाणीवपूर्वक संधीचा फायदा घेण्यासाठी रचला गेलेला कट आहे. या घटनेचा आणि धार्मिक हिंदू-मुस्लीम दंगलीचा या घटनेची संबंध दिसून आलेला नाही.

सर्वात जास्त दगडफेकही पोलीस ठाण्यासमोर, पोलिसांवर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या मृत्यू प्रकरणाचा व या दगडफेकीचा संबंध नसून हा एक भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीचा कट असू शकतो. हैबतपुर येथील या युवकाला बेदम मारणे ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा संदर्भातला कुठलाच प्रश्न निर्माण होऊ शकत नाही.

वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

यातील चारही आरोपींना आम्ही अटक केली असून या गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे संदर्भातील आवश्यक असणारा बारकाईने तपास करून आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. यासाठी नागरिकांनी पोलीस विभागात सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पिंगळे यांनी केले आहे.

दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल-
याप्रकरणी शहरात ठिकठिकाणी दगडफेक करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या आणि या कटात सहभागी असणाऱ्या वर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंधरा जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून आणखी वीस जणांची नावे समाविष्ट करण्यात येत आहेत असे शहर पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. ह्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir stone throwing was not religious but an attack on police said by police