Loksabha 2019 : राहुल गांधींनाच बाँबला बांधून पाठवायला हवे होते - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

 ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले.

जामखेड (ता.अंबड) - ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले.

जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘स्थानिक पातळीवरील नेतेही पंतप्रधान नरेंद्र मोंदींबद्दल बोलत आहेत. कुठे झाला सर्जिकल स्ट्राईक, कितीजण मेले, असा प्रश्‍न विचारत आहेत. अशा लोकांना हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी सोडले पाहिजे.’ 

स्वच्छतागृहाअभावी महिलांची होणारी कुचंबणा सरकारने थांबविली. उज्ज्वला योजनेतून गॅस दिला. देशातील गोरगरीब जनतेला आयुष्यमान योजनेचा फायदा दिला. काँग्रेस हे गरिबांसोबत नव्हते. त्यांच्या सरकारच्या काळात गरिबी हटण्याऐवजी वाढतच गेली. देशावर आधी ब्रिटिशांनी, स्वातंत्र्यानंतर गांधी घराण्याने राज्य केले. आता संरक्षण आणि विकासासाठी देशाला नरेंद्र मोदी यांची गरज आहे. त्यामुळे दानवे यांना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

उमेदवार दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचीही भाषणे झाली. आमदार नारायण कुचे, डॉ.भागवत कराड, जालना मतदारसंघाचे निरीक्षक गणेश हाके, माजी आमदार विलास खरात, शिवाजी चोथे, संतोष सांबरे, सभापती विलास भुमरे, भानुदास घुगे, नगराध्यक्ष देविदास कुचे, जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडके, जितेंद्र पालकर, नंदकिशोर पिंगळे, वसंत जगताप यांची उपस्थिती होती.

Web Title: Loksabha Election 2019 Rahul Gandhi Bomb Pankaja Munde Politics