जमावबंदीचे आदेश! थर्टी फर्स्टला बाहेर पडणं पडू शकेल महाग

हरी तूगावकर 
Thursday, 31 December 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. त्यात कोरोनाच्या नवीन विषाणूची जोरदार चर्चा आहे.

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. त्यात कोरोनाच्या नवीन विषाणूची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मावळत्याला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांना घरातच बसून अत्यंत साध्यापद्धतीने करावे लागणार आहे. सध्‍या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी (१४४ कलम) लागू केली आहे. 

अनलॉकनंतर अनेक व्यवहार सुरळीत होत आहेत. तरीही कोरोनाचे सावट सरलेले नाही. आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत करताना शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कमम १४४ नुसार जिल्ह्याच्या हद्दीत ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

जातपंचायतीच्या दंडावरून उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणाचा खून; आईने केली तक्रार, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

गर्दी टाळणे आवश्यक-
३१ डिसेंबर २०२० ला दिवसभर संचारबंदी नसली तरीही सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व एक जानेवारी २०२१ ला नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने हे कार्यक्रम साजरे करावेत. ३१ डिसेंबरच्या दिवशी उद्याने, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता शारीरिक अंतराचे पालन करावे, सातत्याने मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

ज्येष्ठांनी घ्‍यावी काळजी-
लातूर जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन टाळावे, मिरवणुका काढू नयेत, असे सूचित करण्यात आले आहे. 

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

नियमांचे पालन हवेच-
नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात. अशाठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता शारीरिक सोशल डिस्टन्सिंगचे अंतरचे पालन करावे, संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात, फटाक्यांची अतषबाजी करू नये, ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समूह, भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: look back 2020 Latur curfew thirty first celebration