कोरोनामुळे आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधी- मानसोपचारतज्ज्ञ मिलिंद पोतदार

हरी तुगावकर
बुधवार, 8 एप्रिल 2020

घरात बसून, पाठीमागे वळून आयुष्याकडे पाहणे, नातेसंबंधाची वीण घट्ट करणे, पुढे आपल्याला काय मिळवायचे आहे, याचे नियोजन करणे शक्य आहे. म्हणजेच आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधी कोरोनामुळे उपलब्ध झाली आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे, असे मत येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी ‘सकाळ`शी बोलताना व्यक्त केले.

लातूर ः कोरोनामुळे सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. हा काळ सर्वांसाठीच कठीण आहे. घरात बसल्याने वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत; पण या आपत्तीकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. काळजी, चिंता आणि पॅनिक होणे या तीन पातळीवर याकडे पाहावे लागेल. घरात बसून, पाठीमागे वळून आयुष्याकडे पाहणे, नातेसंबंधाची वीण घट्ट करणे, पुढे आपल्याला काय मिळवायचे आहे, याचे नियोजन करणे शक्य आहे. म्हणजेच आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधी कोरोनामुळे उपलब्ध झाली आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे, असे मत येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी ‘सकाळ`शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न ः कोरोनामुळे सर्वांच्याच मनात भीती आहे. अशा स्थितीत काय काळजी घ्यावी?
डॉ. पोतदार ः आपण आपत्ती की संधी म्हणून पाहतो त्यावर बरेच अवलंबून आहे. या काळात आपण आपल्या नियंत्रणात नसलेल्याच गोष्टीची चिंता अधिक करतो. त्यामुळे नकारात्मक विचार अधिक येत आहेत. असे विचार वाढले, की माणूस पॅनिक होतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्याची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचाच विचार केला पाहिजे. त्यामुळे काळजी करा; पण अति चिंता करू नका.

वाचा ः लातूरचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणतात, बिनधास्त वाचा वृत्तपत्र !

प्रश्न ः घरात राहावे लागत असल्याने आर्थिक प्रश्नासोबतच अनेकांचा मानसिक ताण वाढत आहे. त्यांनी कसे सामोरे जावे?
डॉ. पोतदार ः हाताला काम नाही, आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रत्येकावर मानसिक ताण आहे. यातून बाहेर पडले पाहिजे. आहे त्या स्थितीला सामोरे जात घरात बसून भविष्याचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. लॉकडाऊन किती दिवस चालेल हे सांगणे अवघड आहे. काटकसरीने खर्च करून आर्थिक नियोजन करायला हवे.

प्रश्न ः घरात बसून अनेकांचा चिडचिडेपणा वाढताना दिसत आहे. त्यावर उपाय?
डॉ. पोतदार ः आतापर्यंत आपण पळत होतो. थांबलो तर काय होईल, अशी आपली सर्वांची अवस्था झाली होती; पण लॉकडाऊनने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. या आपत्तीकडे संधी म्हणून पाहिले तरच चिडचिडेपणा कमी होईल. सर्व घरातच असल्याने वेळ देणे शक्य आहे. नातेसंबंधाची वीण घट्ट करण्याची ही नामी संधी आहे. घरातील ज्येष्ठ, जोडीदार, मुलांना समजून घेण्याची ही संधी आहे.

हेही वाचा ः औशात सोशल डिस्टन्सिंगसह संचारबंदीचा फज्जा, बँकेसमोर गर्दी अन् रस्ते माणसांनी...

प्रश्न ः गृहिणींनी दैनंदिन नियोजन कसे करावे?
डॉ. पोतदार ः गृहिणींची धावपळ होत आहे, हे खरे आहे. घरात सर्वच सदस्य ऑर्डर सोडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढताना दिसत आहे. अशा वेळी लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सर्व सदस्यांत कामाचे वाटप झाले, तर गृहिणीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

प्रश्न ः ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
डॉ. पोतदार ः हा काळ ज्येष्ठ नागरिकांची परीक्षा घेणारच आहे. त्यांनी बाहेर फिरणे कटाक्षाने टाळावे. घराच्या अंगणात, टेरेसवरही फिरून आपल्याला व्यायाम करता येतो. चिंता करण्यापेक्षा सकारात्मक विचार करायला हवा, तब्येतीची काळजी घ्यायला हवी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look At Life New Way In Coronavirus Era, Said Psychiatrist Milind Podar