सव्वातीन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

72,190 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे 

उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिपावसाने सुमारे तीन लाख 26 हजार 942 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत 72 हजार 190 शेतकऱ्यांचे 89 हजार 240 हेक्‍टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात गेले 20 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षे जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकऱ्यांनी यंदा जेमतेम पावसावर खरिपाची पेरणी केली. त्यातही अनेक ठिकाणी चांगले पीक आले. सुमारे 85 टक्के क्षेत्र सोयाबीनच्या पेरणीत आहे. सध्या सोयाबीन काढणीचा मोसम सुरू असताना वीस दिवसांपासून दररोज पाऊस येत आहे. त्यामुळे कुठे सोयाबीन वाहून गेल्याचे चित्र आहे. तर कुठे सोयाबीनच्या उभ्या पिकाला अंकुर फुटले आहेत. संकरित ज्वारी, पिवळी आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. 

खरीप हंगाम हातचा गेला 
अतिपावसाने जिल्ह्यातील तीन लाख 26 हजार 942 हेक्‍टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. जिल्ह्यातील एकूण तीन लाख 39 हजार 418 शेतकऱ्यांपैकी 72 हजार 190 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये 89 हजार 240 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजूनही जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामध्ये सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम पदरात पडेल अशी अपेक्षा होती. मात्र अतिपावसाने हातचे पीक वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू आहे. अंदाजे तीन लाख 26 हजार 942 हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे चित्र आहे. 89 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून हे क्षेत्र बाधित झाले आहे. उर्वरित पंचनाम्याचे काम सुरू आहे. तीन-चार दिवसांत जिल्ह्यातील पंचनाम्याचे काम पूर्ण करून वरिष्ठ स्तरावर त्याचा अहवाल सादर केला जाईल. 
- राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of crop on all over more than three lakh hectares