नोटाबंदीने दररोज 500 कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका ट्रान्सपोर्टला बसला असून मोटार वाहनांचे चक्के जाम होत असल्याने दररोज जवळपास 500 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती औरंगाबाद गुड्‌स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली.

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका ट्रान्सपोर्टला बसला असून मोटार वाहनांचे चक्के जाम होत असल्याने दररोज जवळपास 500 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती औरंगाबाद गुड्‌स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली.

देशभरातील विविध वाहतूकदारांकडून नोटाबंदीनंतर मालवाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती ऑल इंडिया मोटार कॉंग्रेसने मागविली होती. औरंगाबाद गुड्‌स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सर्व माहिती पाठविली आहे. रस्ते वाहतूक ही राष्ट्रासाठी अत्यावश्‍यक सेवा प्रदान करण्याच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या प्रवर्गात असावी अशी मागणी करण्यात आली आहे. असोसिएशनने मोठ्या चलनी नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. शासनाला सहकार्याची भावना ठेवली. मात्र सद्यःस्थितीत रस्ते वाहतूक व्यवसाय अडचणीत आहे. आता जुन्या नोटा स्वीकारणे बंद झाले असून टोलमाफी रद्द केली आहे. पेट्रोलपंपावरसुद्धा जुन्या नोटा स्वीकारणे बंद झाल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

बॅंकांतून पैसे काढण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. अतिशय तुटपुंजी रक्कम बॅंकांकडून दिली जाते. रोख उपलब्ध होत नसल्याने व्यवसायावर चलन तुटवड्याचा परिणाम झाला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात वस्तू पुरवठ्यावर घट दिसून येईल.

देशात राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 391 टोल प्लाझा आहेत. याव्यतिरिक्त राज्य महामार्गावर, नगर निगम हद्दीतदेखील टोल आहेत. याचे शुल्क बहुतांश वेळेस रोख होते मात्र चलन नसल्याने अडचणी येत आहेत. डिझेल भरण्यासाठी प्लीट कार्डचा उपयोग होऊ शकतो; मात्र 80 टक्के वाहतूकदार हे लहान व्यावसायिक असून त्यांच्याकडे फक्त 1 ते 5 वाहने आहेत. ते टोल भरताना रोख रकमेचा वापर करतात.

Web Title: loss by currency ban