सहा गावांतील रेशीम उत्पादकांचे साडेपाच कोटींचे नुकसान, कुठे आणि का ते वाचा...

अच्युत जोगदंड
Friday, 24 April 2020

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील देवठाणा, वझूर, बरबडी, चुडावा, देऊळगाव, मजलापूर परिसरातील गावांतील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम कोश उत्पादन करतात. मात्र, लॉकडाउनने या शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. 

पूर्णा : लॉकडाउनचा विपरीत परिणाम तालुक्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. बाजारपेठेत कोष विक्रीसाठी नेता येत नसल्याने तालुक्यातील सहा गावातील ८४ रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल पाच कोटी ३७ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील देवठाणा, वझूर, बरबडी, चुडावा, देऊळगाव, मजलापूर परिसरातील गावांतील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम कोश उत्पादन करतात. पारंपरिक शेतीसोबत हा उद्योग शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. तालुका व परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी बंगलोर, कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणा येथे जावे लागत असे. तयार कोष तेथे विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांना खर्च करावा लागत असे. शिवाय वाहतुकी दरम्यान त्या कोषाच्या वजनात घटही होत असे.
 
हेही वाचा - परभणीहून फोन येताच तत्काळ मदतीला धावले खासदार डॉ.कोल्हे

रेशीम कोष घरी सांभाळणे सोपे नाही 
पूर्णा येथील कृषी पणन महासंघाचे माजी संचालक डॉ. संजय लोलगे यांनी पुढाकार घेऊन पूर्णा येथे त्यांच्या जागेत समर्थ रेशीम खरेदी बाजारपेठ सुरवात केली. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील महिन्याभरापासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे हाती आलेले उत्पादन शासनाचे केंद्र बंद असल्यामुळे रेशीम कोष विक्री खोळंबली होती. रेशीम कोष हे घरी सांभाळणे सोपे नसल्याने शेतकरी अडचणीत आला होता. डिसेंबरपासून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची खरेदी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - नवीन नळजोडणी प्रक्रियेलाही ‘कोरोना’चा विळखा, कसा, कुठे तो वाचा...

प्रति किलो भावामध्ये घट
‘कोरोना’चा ससंर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन केले आहे. त्यामुळे एका महिन्यात रेशीम खरेदीबाबत शासनाने दिलेल्या निर्णयानंतर रेशीम बाजार खुला झाला. तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटक, महाराष्ट्रात जालना, बारामती व पूर्णा आदी ठिकाणी जिथे प्रति किलोमागे लॉकडाउन अगोदर ४५० ते ५५० असा कोष विकला गेला. मात्र, सध्याच्या घडीला २३० ते २८० या भावाने कोष विकला जात आहे. पूर्णा येथील समर्थ रेशीम खरेदी बाजारपेठेत मागील चार दिवसांत दर वाढलेच नाही म्हणून तालुक्यातील ८४ रेशीम उत्पादक शेतकरी बाधवांचे रेशीम कोष विक्रीत पाच कोटी ३७ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रेशीम विक्रीसाठी जवळपासच्या पाच जिल्ह्यांतील शेतकरी पूर्णा येथे येत आहेत.

शेतकरी रेशीम उत्पादक हतबल
लॉकडाउनमुळे लाखो रुपयांचे कोषामध्ये झालेले नुकसान शेतकरी बांधवांना कोणीही देणार नाही व अपेक्षाही नाही. मात्र, बाजार भावातील प्रति किलोमागील २५० रुपये नुकसान आज सहन करावे लागत आहे. २००९ पासून नुकसान आज जास्त झाले म्हणून या महिन्यात नवीन अंडपुंज कोष तयार करण्यासाठी शेतकरी रेशीम उत्पादक हतबल झाले आहेत. - मधुकर जोगदंड, रेशीम उत्पादक, देवठाणा.

बाजारपेठ खुली होणे गरजेचे 
इतर राज्यात कोष विक्रीसाठी पुढील महिन्यातील निघणाऱ्या बॅचला किमान चारशे ते पाचशे रुपये प्रति किलो भाव मिळावा म्हणजे नुकसान भरून निघेल, अन्यथा रेशीम उद्योगामध्ये नरेगाच्या योजनेसाठी जशी संख्या वाढ झाली व नंतर कमी झाली असेच होइल. मूळ उत्पादक नष्ट होतील, म्हणून खुली बाजारपेठ होणे गरजेचे आहे.- हरिश्‍चंद सोलव, रेशीम उत्पादक, बरबडी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of Rs.5.5 crore to silk growers in six villages, read where and why parbhani news