औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या 62 जागांचे निकाल हाती आले असून, भाजपने जोरदार मुसंडी मारत 23 जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. शिवसेना 18 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सत्तेसाठी आवश्‍यक असलेला बहुमताचा आकडा मात्र कुठल्याही पक्षाला गाठता आलेला नाही. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले असून, राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पुरते पानिपत झाले आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी भाजपला शिवसेनेच्या टेकूची गरज लागणार असून, शिवसेना तो देणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या निकालात अनपेक्षितपणे भाजपने बाजी मारली असून, शिवसेनेला मागे टाकत भाजप आता जिल्ह्यात मोठा भाऊ ठरला आहे. गेल्यावेळच्या 6 जागांवरून भाजपने थेट 23 जागांवर झेप घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. शिवसेनेला पूर्वीच्या 19 जागांमध्ये एक जागा गमवावी लागली आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न मात्र कोणत्याच पक्षाला साकार करता आलेले नाही. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीपैकी कॉंग्रेसने आपल्या जागा कायम राखत त्यात एकने वाढ केली असली, तरी राष्ट्रवादीचा मात्र जिल्ह्यात पूर्णपणे सफाया झाला आहे. राष्ट्रवादीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश राष्ट्रवादीला चांगलाच महागात पडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
62 गटांपैकी भाजप 23, शिवसेना 18, कॉंग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1, तर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. 2012 मध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषदेत 19, तर भाजपचे केवळ 6 सदस्य होते. तर कॉंग्रेस 15 व राष्ट्रवादी 10 सदस्यांसह मनसेच्या पाठिंब्यावर सत्तेत होती. हाती आलेल्या निकालानुसार भाजपला तब्बल 17 जागांचा फायदा झाला आहे. शिवसेनेला 1 जागेचे, तर राष्ट्रवादीला 7 जागांचे नुकसान झाले आहे. 7 सदस्य असलेली मनसे आता एका जागेसह केवळ उपस्थितीपुरती राहिली आहे. अपक्ष व इतर पक्षांचा या निवडणुकीत फारसा जोर दिसला नाही.

पैठण वगळता सर्व तालुक्‍यांत भाजपचा जोर
पैठण तालुका वगळता इतर सर्व तालुक्‍यांत भाजपचा जोर दिसून आला. नगरपालिकेत नगराध्यक्ष असलेल्या भाजपला पैठणमध्ये मात्र खातेही उघडता आलेले नाही. पैठण तालुक्‍यातील 9 पैकी 7 जागा शिवसेनेने जिंकल्या. तर भाजपला कन्नड- 3, वैजापूर- 1, फुलंब्री- 3, खुल्ताबाद- 3, गंगापूर- 5, सोयगाव- 1, सिल्लोड- 4 व औरंगाबाद तालुक्‍यात 3 जागा मिळाल्या. तर कॉंग्रेसला गंगापूर, खुल्ताबाद वगळता अन्य तालुक्‍यांत यश संपादन करता आले आहे. राष्ट्रवादीला कन्नड व वैजापुरात अनुक्रमे 1 व 2 जागा सोडल्या तर संपूर्ण जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला आहे.

क्षणचित्रे :
बागडेंची काळेंवर मात : फुलंब्री मतदारसंघातील सर्व सहकारी संस्थांमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मात देणाऱ्या माजी आमदार काळे यांना बागडे यांनी जिल्हा परिषदेत चांगलाच झटका दिला आहे. तालुक्‍यातील 4 पैकी तीन गटांत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

हर्षवर्धन जाधव यांना झटका : शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्‍यात विकास आघाडी करीत स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. पिशोर गटातून त्यांच्या पत्नी संजना यांनादेखील शिवसेनेच्या शुंभागी काजे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

लोणीकरांचे जावई विजयी : स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ऐन निवडणुकीत जावई किशोर पवार यांना भाजपत घेऊन त्यांना कन्नड तालुक्‍यातील चापानेर गटात उमेदवारी दिली होती. किशोर पवार हे प्रचंड मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या रूपाने तालुक्‍यात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले आहे.

बंब यांना दणका : गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांना स्वतःच्या गावातच दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पत्नी व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या कन्या देवयानी पाटील या सावंगी-लासूर स्टेशन गटातून विजयी झाल्या आहेत.

रामकृष्णबाबांची सून विजयी : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या स्नुषा वैशाली पाटील या वैजापूर तालुक्‍यातील लासूरगाव गटातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॉंग्रेस व भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. ऐन निवडणुकीच्या आधी वैशाली पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Web Title: lotus blooms in aurangabad