तिच्या बदनामीसाठी दहा फेक अकाउंट!

Nilesh-Dabhade
Nilesh-Dabhade

औरंगाबाद - प्रेयसीच्या बदनामीसाठी तिचे फेसबुक अकाउंटहॅक केले. तिने पोलिसांत तक्रार देऊन खाते बंद केल्याने उच्चशिक्षित भामट्याने तिच्या नावाने तब्बल दहा फेक अकाउंट तयार करून बदनामी केली. विशेषतः इतरांचे मोबाईल क्रमांक व्हॉट्‌सॲप ग्रुपमधून घेत तो बदनामीचा ‘उद्योग’ करीत असल्याची बाब समोर आली. त्याला ग्रामीण सायबर पोलिसांनी सहा मे रोजी अटक केली. 

नीलेश ज्ञानेश्‍वर दाभाडे (वय २०, रा. धुपखेडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील महिला घटस्फोटानंतर विभक्त राहते. सहा महिन्यांपासून ती खासगी नोकरी करते. तिला वडिलांनी मोबाईल घेऊन दिला. ११ फेब्रुवारीला तिला चुलत भावाने तिचे आक्षेपार्ह फोटो व मेसेज फेसबुकवर अपलोड झाल्याची बाब सांगितली. त्यानंतर तिने पाहिले असता, ‘‘कुणालाही विचारा माझा अड्डा कुठे आहे, कोणीही सांगेल,’’ असा मजकूर व तिचाच मोबाईल क्रमांक तिच्या फेसबुक टाइमलाइनवर होता. २५ फेब्रुवारीला तिने बिडकीन पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचे बनावट फेसबुक खाते बंद केले; परंतु भामट्याने पुन्हा दुसरे खाते उघडून त्यावर तिचा फोटो व मोबाईल क्रमांक टाकला. यानंतर तिने बिडकीन ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ग्रामीण सायबर शाखेच्या पथकाने बनावट फेसबुक खाते उघडणाऱ्याचा शोध घेतला. त्यानंतर संशयित भामट्याला अटक केली. ही कारवाई निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, जमादार कैलास कामठे, पोलिस नाईक रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप व गजानन बनसोड यांनी केली.

तो व ती एकाच कंपनीत काम करीत होते. तिथे त्यांची ओळख झाली. त्याने तिला प्रपोज केले. कुणीतरी जीवनसाथी हवा म्हणून तिनेही हो म्हटलं. तीन महिने प्रेमरंग फुलल्यानंतर अचानक एक दिवस त्याला ती दुसऱ्याच्या दुचाकीवर दिसली. समज-गैरसमज वाढल्याने त्याने मग तिला अशा पद्धतीने त्रास देण्यास सुरवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोबाईल क्रमांक 
युजरनेम, पासवर्ड अंगलट
वेगवेगळ्या व्हॉट्‌सॲप ग्रुपमधील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व नाव 
कॉपी करून घेत दाभाडे त्यांच्या फेसबुक खात्याचा शोध घ्यायचा. फेसबुक खात्याचा युजर व पासवर्ड मोबाईल क्रमांकच असेल अशी अकाउंट क्रॅक होत असत. या युजर्सची फेसबुक अकाउंट हॅक केल्यानंतर मूळ प्रोफाईल फोटो काढून त्याऐवजी महिलेचे नाव, फोटो व अश्‍लील मजकूर पोस्ट करीत होता. याच अकाउंटवरून महिलेच्या गावातील लोकांना रिक्वेस्ट पाठवीत होता. 

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आवाहन
-कोणत्याही अनोळखी व्यक्तींना फेसबुक, व्हॉटस्‌ॲप ग्रुपमध्ये मित्र म्हणून निवडू नका.
-सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, ई-मेल, मोबाईल, जन्मदिनांक, सर्वांना दिसेल अशी ठेवू नका.
-अज्ञात व्यक्तींसोबत समाजमाध्यमांवर चॅट करू नका.
-सोशल मीडियामधील ॲप्लिकेशनमध्ये सुरक्षेबाबत दिलेले अलर्ट सुरू ठेवा.
-परिणामी अकाउंट हाताळल्यास ई-मेलवर, तसेच मोबाईलवर याची माहिती प्राप्त होईल.
-बहुतांश युजर्स पासवर्ड मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, मुलांची नावे ठेवतात, ती ठेवू नये.
-अक्षरे, अंक, विशेष शब्दांचा पासवर्डमध्ये समावेश असावा.
-पासवर्ड नियमित बदला. तो व बॅंक खात्याची माहिती लिहून अथवा मोबाईलमध्ये सेव्ह ठेवू नका.
-सोशल मीडियाद्वारे युजर्सना, तरुणींना त्रास दिला जात असल्यास तक्रार करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com