'लोअर-दुधना' चे पाणी परभणीला मिळणार

Divakar Raote
Divakar Raote

परभणी : जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सततचा दुष्काळ व पाऊसमान कमी झाल्यामुळे नदीपात्र कोरडे पडले तर बोअरचे पाणी अटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोअर-दुधना प्रकल्पातून जिल्ह्यातील नदी पात्रात त्वरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला होता. त्यानंतर या प्रकरणात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शासनाला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यानुसार प्रकल्पातून 15 दलघमी पाणी ता. 15 मे पर्यंत सोडण्याचा निर्णय झाला असून यामुळे हजारो शेतकरी आणि नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची भयावह अवस्था आणि पिण्याच्या पाण्याची झालेली टंचाई यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार दिवाकर रावते यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांनी एक विशेष बैठक घेतली. परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रकल्पातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही आदेश निर्गमित केले. रावते यांची गिरीश महाजन यांच्या सोबतही ही एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांच्याही सोबत त्यांची बैठक झाली. त्यात परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी 15 क्युबिक पाणी विसर्ग करण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाई संदर्भात लोअर दुधना प्रकल्पाचे पाणी विसर्ग करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे देखील अनुकूल होते. त्यामुळे 15 मेपर्यंत या पाण्याचा विसर्ग होणार आहे. 

या गावांना होणार फायदा
लोअर दुधना प्रकल्पातून परभणीसाठी १५ क्युबीक पाण्याचा विसर्ग होणार आहे. परभणी विधानसभा मतदार संघातील टाकळी कुं., नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडीदमई, हिंगला, सुलतानपुर, पिंपळा, सनपुरी आदी गावातील नद्यांच्या पात्रात हे पाणी येणार आहे. त्यामुळे या गावातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होतील. शिवाय नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल जिल्ह्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com