
गेल्या काही वर्षापासून परभणीचे तापमान राज्यात सर्वात कमी नोंदले जात आहे. दरवर्षी डिसेंबर महिण्यात थंडीचा जोर वाढलेला असतो. यंदा परभणीच्या थंडीने महाबळेश्वर व निफाड (जि.नाशिक) लाही मागे टाकले आहे.
परभणी ः परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर परत एकदा वाढला असून सोमवारी (ता. 21) या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 5. 6 अंशापर्यत घसरला. राज्यात ही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून परभणीचे तापमान राज्यात सर्वात कमी नोंदले जात आहे. दरवर्षी डिसेंबर महिण्यात थंडीचा जोर वाढलेला असतो. यंदा परभणीच्या थंडीने महाबळेश्वर व निफाड (जि.नाशिक) लाही मागे टाकले आहे. मागील काही दिवसापासून परभणी शहरात कमालीची थंडी पडत आहे. संपूर्ण जिल्ह्यात हुडहुडी भरत आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून आणखी चार दिवस थंडीचा कडाका काम राहणार असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीतील ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने दिली आहे. रविवारी (ता.20) परभणीचे तापमान सात अंश होते. तर महाबळेश्वरला 13 तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी तर परभणीने उच्चांक करत 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे 12 व निफाड येथे आठ अंश तापमान होते.
हेही वाचा - ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’चा घरोघरी जयघोष
यापूर्वी देखील 2018 मध्ये परभणीचा पारा तीन अंशावर आला होता. तसेच 29 ते 31 डिसेंबर 2018 या तीन दिवस विक्रमी अशा तीन अंश तापमानाची नोंद परभणीत झाली होती. दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने जागो जागी रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रात्रीच्यावेळी रस्ते निर्मनुष्य दिसत असून रात्री नऊ वाजताच प्रत्येकजन आप - आपल्या घरात गेल्याचे चित्र सध्या परभणी शहरात दिसत आहे. शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना तर थंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शेतीची कामे सुरु असल्याने थंडीचा जोर असतांनाही शेतकऱ्यांना थंडीचा कडाका सहन करीत कामे करावी लागत आहे.
जसा हिवाळा तसाच उन्हाळाही
ज्या पध्दतीने परभणी जिल्हयात थंडी पडते तेवढाच उन्हाळ्यात सूर्य ही कोपतो. परभणीकरासाठी हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू विक्रमी असतात. उन्हाळ्यात 47 अंशावर पारा चढतो. आणि हिवाळ्यात पारा दोन अंशावर खाली येतो. त्यामुळे जसी हिवाळ्याती थंडीची मजा परभणीकर लुटतात तशीच उन्हामुळे ही या जिल्ह्यातील रहिवाश्यांची त्रेधा तिरपिट उडत असते.
संपादन- प्रल्हाद कांबळे