esakal | औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी, प्रतीकात्मक सरकार स्थापन
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Cabinet Oath Ceremony in Aurangabad

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरावही मंजूर, क्रांतिसेनेचे अनोखे आंदोलन 

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी, प्रतीकात्मक सरकार स्थापन

sakal_logo
By
आर. के. भराड

वाळूज (जि. औरंगाबाद) - विधानसभेची निवडणूक होऊन 18 दिवस पूर्ण झाले; मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. आतातर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे अखिल भारतीय क्रांतिसेना, मित्र पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मिळून बजाजनगर येथे आज (मंगळवारी) प्रतीकात्मक सरकारची स्थापना केली.

या अनोख्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह अठरा जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. शिवाय प्रतीकात्मक मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ठरावही मंजूर केले. 

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने मोडून पडला; मात्र राजकीय पक्ष, नेते सरकार स्थापनेत अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास त्यांना वेळ नाही. जनतेने दिलेल्या कौलाची ही चेष्टा असून, हे एक प्रकारचे सुलतानी संकटच आहे. याचा निषेध म्हणून अखिल भारतीय क्रांतिसेनेच्यावतीने सर्वसामान्य जनतेचे प्रतीकात्मक सरकार बजाजनगर येथे स्थापन करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये प्रतीकात्मक मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्या खात्याच्यावतीने जनसामान्यांना अभिप्रेत असलेल्या मागण्या तातडीने मंजूर करण्यात आल्या, अशी माहीती आंदोलनचे मुख्य संयोजक तथा क्रांतिसेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांनी दिली. या आंदोलनात छावाचे चंद्रकांत भराट यांनी राज्यपालांची भूमिका निभावली. 
 

हे आहेत मुख्यमंत्री 

प्रतीकात्मक मुख्यमंत्री म्हणून नितीन देशमुख, विधानसभा सभापती म्हणून शरद जाधव, गृहमंत्री दिनेश दुधाट, महसूलमंत्री शरद पवार, पुरुष आयोग भरत फुलारे, क्रीडामंत्री औदुंबर देवडकर, ऊर्जामंत्री अमोल काळे, कामगारमंत्री राजू शेरे, जलसंपदामंत्री लक्ष्मण कदम, ग्रामविकासमंत्री सविता शिंदे, पर्यटनमंत्री दीपक गायकवाड, उच्चशिक्षणमंत्री मयूर गोसावी, उत्पादन शुल्कमंत्री मनोहर निकम, शिक्षणमंत्री आशिष वाघमारे, आरोग्यमंत्री प्रवीण साबळे, वनमंत्री पद्मनाभ कुलकर्णी, उद्योगमंत्री एकनाथ खरात, कृषिमंत्री संजय कोकाटे आदींनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी क्रांतिसेनेचे कृष्णा सावंत, साईनाथ कासोळे, शंकार गरुड, गणेश जाधव, सुनील शिंदे, किशोर गायकवाड, गजानन खाडे, अमोल सोळंके, अशोक सोळंके, सागर लाड, मयूर गोसावी आदी सहभागी झाले होते. 

loading image