लातूर जिल्ह्यातील पोलिस उपनिरीक्षकाच्या मदतीची गृहमंत्र्यांकडून प्रशंसा, रक्तदान करून जखमीचे वाचविले प्राण

Killar's PSI Amol Gunde
Killar's PSI Amol Gunde

औसा (जि.लातूर) : दुचाकीवरून पडलेल्या व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला आपले रक्त देऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या किल्लारी (ता. औसा) येथील पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्या मानवतेच्या भावनेतून केलेल्या कामाची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दखल घेत त्याचे कौतुक केले आहे. अमोल गुंडे यांच्या खाकीआड लपलेला एक संवेदनशील आणि सामाजिक भान असलेला अधिकारी आज संबंध लातूर जिल्ह्याला दिसला.


मंगळवारी (ता.एक) शाहजानी औरादजवळ एक व्यक्ती अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात रक्तस्राव खूप झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला A निगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. या गटाचे रक्त सहसा लवकर उपलब्ध होत नाही. म्हणून या रक्तगटाचा माणूस शोधणे सुरू झाले. हे शोधत असताना किल्लारी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे असल्याचे समजल्यावर रक्तपेढीतून त्यांना फोन करण्यात आला. श्री.गुंडे यांनी क्षणाचाही विचार न करता रक्तपेढी गाठली आणि रक्तदान केले.

या रक्तावर पुढील प्रक्रिया करून जखमीला हे रक्त देण्यात आले. त्यामुळे एका नाजूक अवस्थेत असलेल्या जखमी रुग्णाला जीवदान मिळाले. पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ही बातमी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समजली. त्यांनी ट्विट करीत अमोल गुंडे यांचे कौतुक केले. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, लातूर पोलिस दलातील किल्लारी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रक्तदान केले. संवेदनशील गुंडे यांनी कार्यतत्परतेने केलेल्या मदतीमुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचले. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आहे.


पोलीस या ना त्या कारणाने समाजोपयोगी काम करीतच असतात. यात लातूर पोलिसांची मान उंचावणारे काम अमोल गुंडे यांच्या कार्यामुळे घडले आहे. प्रत्येक संकटकाळात पोलिस नुसत्या कायद्याच्या चौकटीतच मदत करीत नाहीत, तर मानवी संवेदना जपतही ते काम करतात हे यातून दिसून येते. अमोलचे हे काम सर्वांना प्रेरणादायी आहे.
- राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com