
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून (ता. एक) सर्व वर्ग एकाच वेळी भरवण्याची सुचना शिक्षण विभागाने शाळांना केली होती.
लातूर : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून (ता. एक) सर्व वर्ग एकाच वेळी भरवण्याची सुचना शिक्षण विभागाने शाळांना केली होती. मात्र, वर्ग एकत्र घेण्यास पालक विरोध करत असल्याने मोजक्या शाळांचा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी पू्र्वीप्रमाणेच एकानंतर एक वर्ग घेण्यात येत आहे. दरम्यान दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थोडी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळांतील नववी व दहावी तर उच्च माध्यमिक विद्यालयांतील अकरावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनामुळे सुरवातीला माध्यमिक शाळांत एक दिवस नववी तर दुसऱ्या दिवशी दहावी आणि उच्च माध्यमिक विद्यालयात एक दिवस अकरावी तर दुसऱ्या दिवशी बारावीचे वर्ग भरवण्यास सुरवात झाली. यामुळे शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच दिसून येत होती. या सर्व वर्गांवर शिकवणाऱ्या शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाने एकदिवसाआड वर्ग भरवण्याची पद्धत बंद करून मंगळवारपासून सर्व वर्ग एकाच दिवशी भरण्याचे आदेश शाळांना दिले होते.
या आदेशानुसार काही ठिकाणी शाळांनी सर्व वर्गाचे एकाच दिवशी अध्यापन सुरू केले. मात्र, बहुतांश ठिकाणी या एकाच दिवशी वर्ग घेण्याला पालकांनी विरोध दर्शवला. राज्याच्या अन्य जिल्ह्यात अजून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू न झाल्या नसल्याने आणखी काही दिवस पूर्वीप्रमाणेच एकदिवसाआड वर्ग घेण्याचा आग्रह पालकांनी धरला. यामुळे काही शाळांतच सर्व वर्गाचे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले तर बहुतांश शाळांत विद्यार्थ्यांनी पू्र्वीप्रमाणे एकदिवसाआड हजेरी लावल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
काही शाळांतील एकाच दिवशी सर्व वर्गाचे कामकाज सुरू झाल्यामळे शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थोडी वाढ झाली आहे. काही शाळाही सुरू झाल्या आहेत. शनिवारी (ता.२८) ६३२ पैकी सुरू झालेल्या ६०२ माध्यमिक शाळांत २२ हजार ४४५ विद्यार्थी उपस्थित होते. बुधवारी (ता. दोन) ६१० शाळांत २९ हजार १२५ विद्यार्थी उपस्थित राहिले. शनिवारी २७६ पैकी २५० उच्च माध्यमिक विद्यालयात सहा हजार ५८२ विद्यार्थी उपस्थित होते. बुधवारी २५४ उच्च माध्यमिक विद्यालयात सात हजार १६२ विद्यार्थी उपस्थित राहिल्याचे श्री. उकीरडे यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर