शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये "ऍवॉर्डवापसी'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत दांडेगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास साळुंके यांनी आज (बुधवार) कृषी उद्यान पंडीत पुरस्कार परत केला आहे. या पुरस्काराचे प्रमाणपत्र व पदक निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडे सुपुर्द केले आहे.

हिंगोली - राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत दांडेगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास साळुंके यांनी आज (बुधवार) कृषी उद्यान पंडीत पुरस्कार परत केला आहे. या पुरस्काराचे प्रमाणपत्र व पदक निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडे सुपुर्द केले आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील दांडेगाव येथील शेतकरी कैलास साळुंके हे परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. या भागात त्यांनी शेतीमधे नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. याशिवाय इतर शेतकऱ्यांनाही ते शेती उत्पादन वाढविण्यासाठी मदत करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने सन 2004 साली त्यांना उद्यान पंडीत पुरस्कार दिला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, पदक देण्यात आले होते. दरम्यान शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार शासनाला परत करीत असल्याचे निवेदनातून जाहीर केले आहे. साळुंके यांनी पुरस्काराचे प्रमाणपत्र व पदक माचेवाड यांच्याकडे सादर केले असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

प्रमाणपत्र व पदक परत करत असताना त्यांनी माचेवाड यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात भाजपा सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याचे म्हणत शेतीमालाचे धोरण सरकारला ठरविता येत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप केला आहे. शेतीमालाचा दर कोसळले असून त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईतून बाहेर निघू शकत नाही. राज्यातील सरकार भांडवलदारधार्जिने असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title: Maharashtra news hingoli news farmer strike marathi news