Baal Natya Spardha Latur
Baal Natya Spardha Latur

"महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा' उभारू, अमित देशमुख यांची घोषणा

लातूर : दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) धर्तीवर राज्यात "महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा' (एमएसडी) सुरू केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता.17) येथे केली. मात्र, तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही काही वर्षांपूर्वी एमएसडीची घोषणा केली होती. त्यासंदर्भात समितीही नेमली. पण, घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही.

आता तरी एमएसडी महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल का, याकडे नाट्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात देशमुख बोलत होते. स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा मान देशमुख यांनी बालकलाकार स्वयम शिंदे आणि सिद्धी देशमुख यांना या वेळी दिला. महापौर विक्रांत गोजमगुंडे, परीक्षक अरूंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड, डॉ.विक्रम हिप्परकर, नाट्य परिषदेचे शैलेश गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, मनोज पाटील, संचालनालयाचे संचालक बिभिषण चौरे याप्रसंगी उपस्थित होते.

ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश सहदेव आणि सुनीता कुलकर्णी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.श्री.देशमुख म्हणाले, की "महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा' हा सरकारचा अत्यंत महत्वाकांशी प्रकल्प आहे. यासाठी आम्हाला नाट्य जाणकारांच्या सुचनांची आवश्‍यकता लागणार आहे. या संस्थेत देशभरातील आणि जगभरातील नामवंत कलावंत सहभागी होऊन ते आपल्याकडील बाल कलाकारांना, नव्या पिढीतील नाट्य प्रेमींना शिक्षण देतील. त्यांना घडवतील. शेवटी कलाक्षेत्र हा एक उद्योग बनला आहे. या दृष्टीनेही याकडे पाहिले पाहिजे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात होत आहे. कलेचे प्रदर्शन करता येतेच. त्यातून हौस भागवता येतेच. शिवाय, उपजिविकाही भागवता येते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या, तालूक्‍याच्या पातळीवर सांस्कृतिक संचालनालय पोचेल. तिथल्या कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिकता आहे.


प्रत्येक बालकलाकाराला प्रमाणपत्र

राज्यातील कानाकोपऱ्यातून बाल कलाकार या स्पर्धेत सहभागी होतात. यात यश मिळवलेल्यांना मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील नाट्यनिर्माते-दिग्दर्शक यांच्याकडे शिफारस करायला हवी. यासाठी संचालनालय पुढाकार घेईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल कलाकाराला राज्य सरकारचे प्रमाणपत्र याआधी मिळत नव्हते. केवळ संघाला दिले जात होते. पण यापुढे प्रत्येक बालकलाकाराला ते दिले जाईल. याशिवाय, मुंबई-कोल्हापूर येथील चित्रपटनगरीत बालकलाकारांना आणखी प्रशिक्षण घेण्यासाठी, अभिनयाबरोबरच नेपथ्य, रंगमंचीय व्यवस्था याबाबत शिक्षण घेण्यासाठी नवे दालन सुरू करता येईल.

याचाही आम्ही विचार करू, असे देशमुख यांनी सांगितले. ही स्पर्धा दगडोजी देशमुख सभागृहात 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात प्रेक्षकांना 24 बालनाटके मोफत पाहायला मिळणार आहेत.---लातूर हे सांस्कृतिक केंद्र बनेल----विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य बालनाट्य स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी लातूरात होत आहे, याचा आनंद आहे, असे सांगून देशमुख म्हणाले, या स्पर्धा राज्यातील दहा केंद्रावर घेतल्या जातील. पुढील वर्षापासून ही स्पर्धा 15 केंद्रावर घेतली जाईल. त्यात लातूरचा समावेश असेल. राज्य नाट्य स्पर्धेच्या समन्वयक, सहसमन्वयकाचे मानधनात वाढविण्याचा सकारात्मक विचार केला जाईल. अशा वेगवेगळ्या धोरणांतून लातूर शहर हे येत्या काळात सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला यावे, असा आमचा प्रयत्न आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com