अघोरी बाबाचा अंनिसकडून भंडाफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

औरंगाबाद - भूतबाधेसह इतर आजारांवर अघोरी प्रकार करणाऱ्या व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला. तंत्रविद्या येत असल्याचे भासवत बाबा हातचलाखी करून अनेकांना गंडवीत होता, असेही तक्रारीत नमूद केल्याची माहिती अंनिसतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद - भूतबाधेसह इतर आजारांवर अघोरी प्रकार करणाऱ्या व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला. तंत्रविद्या येत असल्याचे भासवत बाबा हातचलाखी करून अनेकांना गंडवीत होता, असेही तक्रारीत नमूद केल्याची माहिती अंनिसतर्फे देण्यात आली.

अंनिसचे राज्य सचिव शहाजी भोसले यांच्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील हर्सूल गावात गनी कादर पठाण तांत्रिक बाबा भूतबाधेतून बाहेर काढणे, दुर्धर आजार नीट करणे, गुप्तधन शोधून देणे असे अघोरी प्रकार  करतो. याबाबत माहिती समजल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बाबाचे व त्याच्या अघोरी विद्येचे स्टिंग ऑपरेशन केले. शहाजी भोसले यांच्या नेतृत्वात अतुल बडवे, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चौतमोल यांनी बाबाच्या हर्सूलच्या जमनज्योती भागात दर्ग्यावर जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी त्याच्या सर्व क्‍लृप्त्या आणि हातचलाखी हेरून त्याचे छायाचित्रणही करण्यात आले. त्याची गंडविण्याची पद्धत, अंधश्रद्धेतून लोकांची दिशाभूल करून भीती दाखवत तो लोकांना फसवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात जाऊन कार्यकर्त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षकांकडे तक्रार दिली. त्या मांत्रिकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बारगळ यांनी सांगितल्याची माहिती शहाजी भोसले यांनी दिली.

असा होता प्रकार 
भूतबाधा काढण्यासाठी तो विज्ञानाचा सहारा घेत लिंबाचा रस व सोडियम मेटल यांची रासायनिक अभिक्रिया करून आग लावीत होता. ही आग तांत्रिक विद्येमुळे लागली, असे लोकांना भासवत होता. ही क्रिया करताना बऱ्याचदा बाबा शारीरिक शोषणही करीत होता. भूतबाधा व इतर अघोरी उपचारांसाठी तो हजारो रुपयांची मागणी करीत होता, असे भोसले यांनी सांगितले.

अमावास्या, पौर्णिमेचीच निवड
अमावास्या व पौर्णिमेच्या रात्री तो लोकांना बोलावून त्यांच्याकडून अघोरी प्रकार करवून घेत होता. तंत्रविद्या येते, असे सांगून तो लोकांकडून पैसे गोळा करीत असल्याचेही भोसले यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Superstition Nirmulan Samiti