या ठिकाणी 'नोटा' दुसऱया क्रमांकावर, तब्बल 30 हजार मते | Election Results 2019

विकास गाढवे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बंडखोरांकडून 'नोटा' चा प्रचार 
 

लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या 'नोटा' ला तब्बल 27 हजार 287 एवढी विक्रमी मते मिळाली आहेत. आणखी चार मतदान यंत्रावरील मते व टपाली मते मोजणे बाकी असल्याने अंतिम निकालात त्यात वाढ होण्याची शक्‍यता असून नोटा आकडा तीस हजाराच्या पुढे जाणार आहे. यातूनच मतदारसंघात 'नोटा' ही दुसऱ्या क्रमाकांची उमेदवार ठरली असून प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या दोघांच्या मतांची बेरीजही नोटापेक्षा कमी आहे. 

या निवडणूकीत मतदारसंघात नोटाला मिळालेली मते ही राज्यात सर्वाधिक असण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. मतदासंघात यंदा कॉंग्रेसकडून दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपूत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा विजय सुकर होण्यासाठी वरिष्ठ राजकीय पातळीवर जोरदार हालचाली घडून आल्या. औसा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना सोडण्यासाठी शिवसेनेला लातूर ग्रामीण मतदारसंघ दान देण्यात आला. मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असताना नावालाही पक्षाचे अस्तित्व नसलेल्या शिवसेनला हा मतदारसंघ ऐनवेळी सोडण्यात आला. त्यापुढे जाऊन शिवसेनेची तर सोडाच परंतू कोणाचीही ओळख नसलेल्या उमेदवाराला शिवसेनेने मध्यरात्री उमेदवारी दिली. यामुळे मतदारसंघात फिक्‍सींग झाल्याचा आरोप करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेते व पक्षांविरूद्ध रास्ता रोकोसह अनेक आंदोलने केली.

मतदारांतही कमालीची उदासीनता पसरली. काहीच परिणाम होत नसल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केला. स्वाभीमानासाठी नोटाचे बटन दाबण्याचे आवाहन मतदारांना केले. मतदान केंद्राबाहेर मंडप उभारून नोटाचा प्रचार केला.

हॅंडबिल वाटण्यासोबत सोशल मिडियावरूनही नोटालाच मतदानाचे आवाहन करण्यात आले. यामुळे एखाद्या उमेदवारासारखे मतदारसंघात नोटाचे महत्व चांगले उजळून निघाले. नोटाला जास्त मते मिळाली तर निवडणुक होत असल्याचीही अफवा पसरवण्यात आली. यामुळे कधी नव्हे तर निवडणुकीत नोटाला किती मते मिळाली, याची उत्सुकता सर्वांना होती.

आतापर्यंत जाहिर झालेल्या फेरीत नोटाला 27 हजार 287 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे सचिन देशमुख यांना 13 हजार 335 तर वंचित बहुजन आघाडीचे मंचकराव डोणे यांना 12 हजार 755 मते मिळाली आहेत. मतदारसंघात कॉंग्रेसचे धीरज देशमुख यांनी एक लाख वीस हजार मतांची विजयी आघाडी घेतली असली तरी नोटाला मिळालेल्या मोठ्या मतांमुळे मतदारसंघ चर्चेत आला आहे. धीरज देशमुख यांना राज्यात विक्रमी मताधिक्‍क्‍य मिळाले असले तरी नोटालाही विक्रमी मताधिक्‍क्‍य मिळाल्याने धीरज देशमुख यांनी नोटाचा पराभव केल्याची चर्चा घडून येत आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election