परतूर (जि. जालना) - भाजपचे बबनराव लोणीकर विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लोणीकर यांना 1,05,784 मते तर काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांना 79,735 मते मिळाली.

परतूर (जि. जालना) - येथे भाजपचे बबनराव लोणीकर हे 26,049 मतांनी विजय झाले. लोणीकर यांना 1,05,784 मते तर काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांना 79,735 मते मिळाली.

परतूर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोणीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभाही झाली होती. गेल्या निवडणुकीत चौरंगी लढतीतही प्रतिस्पर्धी जेथलिया यांच्यापेक्षा कमी मताधिक्‍याने लोणीकरांचा निसटता विजय झाला होता. अर्थात, तेव्हा मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, यावेळेला महाआघाडी व महायुती निर्माण झाल्याने निवडणुकीत राजकारणाचे सूत्र बदलले.

प्रचार यंत्रणेतही बदल झाल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षांत मतदारसंघात विकासाची कामे झाली असली तरी पीकविमा, संपूर्ण कर्जमाफी, दुष्काळ निधी व सुसक्षित बेरोजगारीची समस्या आदी मुद्दे या निवडणुकीत लोणीकर यांच्या विरोधकांकडून मांडले गेले. शिवाय लोणीकरांना शह देण्यासाठी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडी मित्रपक्षाचे नेते एकवटले होते.

त्यामुळे सुरवातीला उमेदवार जेथलिया यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. प्रचाराच्या अखेरीस मात्र चित्र बदलत गेले. दोन्ही उमेदवारांचा तुल्यबळ प्रचार सुरू झाला. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांत चांगलीच लढत झाली. यात लोणीकर यांनी बाजी मारली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Paratur result Babanrao Lonikar won