esakal | लातूरात धो-धो : 'मांजरा' भरण्याच्या वाटेवर, 'तेरणा' चे दरवाजे उघडण्याची शक्यता !  
sakal

बोलून बातमी शोधा

LATUR MANJRA DAM.jpg

लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने माकणीचे निम्न तेरणा धरण हेही महत्वाचे आहे. या बुधवारी सकाळी दहा वाजता या धरणाची पाणी पातळी ६०३.६५ मिटर झाली आहे. हे धरणही भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर दरवाजे उघडून तेरणा नदीमार्गे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांनाही पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे

लातूरात धो-धो : 'मांजरा' भरण्याच्या वाटेवर, 'तेरणा' चे दरवाजे उघडण्याची शक्यता !  

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा (धनेगाव, ता. केज) धरण शंभर टक्के भरण्य़ाच्या दिशेने आहे. त्यात धरणात येणारया पाण्याची आवक कायम राहिली तर धरणातून पाणी नदीच्या पात्रात सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच निम्न तेरणा धरणही भरण्य़ाची शक्यता आहे. त्यामुळे या दोनही धरणाच्या खाली नदी काठच्या गावांना तसेच शेतकऱयांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


मांजरा धरणावर लातूरसह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा योजना आहेत. त्यामुळे तीनही जिल्ह्याच्या दृष्टीने हे धरण महत्वाचे आहे. गेल्या वर्षी या धरणात पाणीच आले नव्हते. त्यामुळे वर्षभर मृतसाठ्यातूनच लातूरसह इतर शहरांना पाणी पुरवठा झाला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. पण गेल्या एक दीड महिन्यात मात्र धरणात कमी प्रमाणात का होईना पाणी आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पण गेल्या आठ दिवसात मात्र पाण्याची आवक चांगली राहिली आहे. त्यात बुधवारी रात्रीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याचा येवा राहिला. बुधवारी सकाळी ११ वाजता धरणाची पाणी पातळी ६४१.०७ मीटर राहिली. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७१.०८ टक्के झाला आहे. धरणाच्या पाललोट क्षेत्रात असाच पाऊस राहिला तर धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी मांजरा नदी मार्गे सोडले जाणार आहे. त्यामुळे मांजरा नदी काठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने माकणीचे निम्न तेरणा धरण हेही महत्वाचे आहे. या बुधवारी सकाळी दहा वाजता या धरणाची पाणी पातळी ६०३.६५ मिटर झाली आहे. हे धरणही भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर दरवाजे उघडून तेरणा नदीमार्गे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांनाही पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)