सरसकट कर्जमाफीसाठी ‘चूल बंद’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

खरात आडगावच्‍या ग्रामस्‍थांचे आंदोलन, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

माजलगाव - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी खरात आडगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २४) चूल बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्जाच्या पुनर्गठण प्रश्‍नावरून शेतकरी रामेश्वर शेजूळ यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

खरात आडगाव येथे रविवारी सरपंच निवृत्ती रासवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी चूल बंद आंदोलन करण्याचा ठराव घेतला. श्रावणाचा पहिला सोमवार असताना गावातील सर्वच घरांतील चुली न पेटवता ग्रामस्थांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी मोहन शेजूळ, रवी रासवे, हनुमान देवकते, सुंदर रासवे, गुलाब आढाव, गुलाब शेजूळ, किरण शेजूळ, बाबू हाके, बबन देवकते यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

नायब तहसीलदार पी. बी. शिरसेवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी तलाठी एस. डी. ठोसरे, पंचायत समिती सदस्य मिलिंद लगाडे, ग्रामसेवक डी. जी. करे, मंडळ अधिकारी एस. आर. झोंबडे यांची उपस्थिती होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनस्थळी शेतकरी रामेश्वर भागवत शेजूळ (वय २५) यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याकडे हैदराबाद बॅंकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे, मात्र बॅंकेने न विचारता पुनर्गठण केल्याचा आरोप शेजूळ यांनी केला.

साडेचारशे घरांमध्ये पेटली नाही चूल
चूल बंद आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाल्याने गावातील साडेचारशे घरांमध्ये सोमवारी चूल पेटली नाही. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे आंदोलन असल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी घराला कुलूप लावून चूल बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला.

माझ्याकडे एक एकर जमीन असून पन्नास हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. नुकत्याच झालेल्या कर्जमाफीचा कसलाही लाभ झाला नाही. त्यामुळे या आंदोलनात चूल बंद ठेवून सहभाग नोंदविला आहे.  
- मीरा चोरमले, शेतकरी

Web Title: majalgav marathwada news chul band for loan waiver