नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू

कृष्णा पिंगळे 
Friday, 16 October 2020

दसऱ्याच्या निमित्ताने घरातील कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसोबत दोन मुले व त्यांना वाचवणाऱ्या मामाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथे (ता.१६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

सोनपेठ ः दसऱ्याच्या निमित्ताने घरातील कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसोबत दोन मुले व त्यांना वाचवणाऱ्या मामाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथे (ता.१६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

गावातील काही महिला सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुले देखील होती. 
याच वेळी सचिन सुरेश मुळे (वय सात, रा.निमगाव) हा छोटा मुलगा नदीपात्रात अचानक पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण शिवकण्या सुरेश मुळे (वय १५) हिने पाण्यात उडी मारली. परंतू, त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते दोघेही बुडत असल्याचे पाहून नदी शेजारीच असणारा त्यांचा मामा सचिन संभाजी बोडखे (वय २०, रा.सोनपेठ) याने पाण्यात उडी घेतली. परंतू भाच्यांना काढण्यात मामालाही अपयश आले. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. 

हेही वाचा - उध्दव ठाकरेंना स्मृतिभ्रंश झाल्याने त्यांनी च्यवणप्राश घ्यावा ; कोण म्हणाले वाचा ?

सर्वच नदी-नाल्यांना पाणी 
मागील काही दिवसात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना पाणी आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाण नदीला पाणी नव्हते. मात्र, यावर्षी नदीला पाणी असल्यामुळे तसेच नवरात्रीच्या निमित्ताने कपडे धुण्यासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा वापर करत आहेत. निमगाव येथील वाण नदीच्या काठावर धुणे धुण्यासाठी सोनपेठवरून गेलेल्या होतकरू तरुण सचिन बोडखे हा देखील आपल्या कुटुंबासोबत कपडे धुण्यासाठी गेला होता. सचिन हा अतिशय हुशार आणि होतकरू तरुण म्हणून सर्वत्र परिचित होता. लॉकडाउनमुळे घरीच राहून आपल्या वडिलांना मदत करणाऱ्या सचिन बोडखेचा असा करुण अंत झाल्यामुळे संपुर्ण सोनपेठ शहरावर शोककळा पसरली होती. तसेच ऐन सणासुदीच्या तोंडाला दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे निमगाव येथे देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - हिंगोलीत १३ हजार लिटर क्षमता असलेल्या जम्बो सिलिंडरची उभारणी

पोलिसांची शोधाशोध सुरु 
बहीण भाऊ व मामा असे तीनजण वाण नदीपात्राच्या पाण्यात बुडाल्याची माहिती निमगाव येथील ग्रामस्थांनी सोनपेठ पोलिसांना दुपारी कळवली. या वेळी सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, जमादार वचीष्ठ भिसे, दिलीप निलपत्रेवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या मुलांची शोधाशोध सुरू करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन बहीण भावंडांचा मृतदेह सापडला. मात्र, मामा सचिन बोडखे याचा शोध घेणे उशिरापर्यंत चालूच होते. त्याचा मृतदेह सातच्या सुमारास सापडला.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mama-niece drowned on the eve of Navratri, Parbhani News