हिंगोलीत १३ हजार लिटर क्षमता असलेल्या जम्बो सिलिंडरची उभारणी

राजेश दारव्हेकर
Friday, 16 October 2020

दरम्यान ऑक्सिजन संपण्याच्या भीतीला आता पूर्णविराम लागला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच या टॅंकचे उद्घाटन करण्यात आले.

हिंगोली : हिंगोलीत १३ हजार लिटरच्या जम्बो सिलिंडरची उभारणी करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन पुरवठा कोरोना बाधित रुग्णांना पुरवण्यात येत आहे. दरम्यान ऑक्सिजन संपण्याच्या भीतीला आता पूर्णविराम लागला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच या टॅंकचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची नितांत गरज आहे. ऑक्सिजन संपू नये यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. ही बाब पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याही लक्षात आणून देण्यात आली होती. याबाबत वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वतः लक्ष घालून रुग्णासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक उभारणीसाठी पाठपुरावा केला आहे. हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज परिस्थितीत दोन हजार ९०९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून दोन ६६६ रुग्ण बरे झाले आहेत. हिंगोली येथील रिकव्हरी रेट चांगला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणसुध्दा चांगले आहे. ऑक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी येथे १३ हजार लिटर क्षमतेचा आॅक्सिजन टँक उभारण्यात आला आहे.

हेही वाचा वाहरे...पठ्ठ्या ! लेटलतीफ कर्मचा-यांची उपसभापतींनी घेतली हजेरी, तब्बल 43 कर्मचा-यांवर होणार कारवाई -

यांची होती उपस्थिती 

नियमित पाठपुरावा असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना या ऑक्सिजन टँकमुळे संजीवनी मिळत आहे. दिवसाकाठी येथे एक हजार लिटर ऑक्सिजन लागतो. या टॅंकमध्ये १३ हजार लिटर ऑक्सिजन बसत असून १३ दिवस आता चिंता करण्याची गरज नाही. ऑक्सिजन संपण्याच्या दोन दिवस अगोदर  मागणी केली जाणार असून ऑक्सिजनचा अखंडीत पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान उदघाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमा, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. डोंगरे, डॉ. नगरे, डॉ. मोरे, गिरी, एस. टी. नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of 13 thousand liter jumbo cylinder at Hingoli