नातेवाईकाच्या लग्नला जाणे राहिले; अपघातात सासरा ठार, सून व नातू गंभीर जखमी

निसार शेख
Wednesday, 6 January 2021

नगर-धामणगाव बीड महामार्गावरील पाटण सांगवी शिवारात बुधवारी (ता.सहा) सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली.

कडा  (जि.बीड) : नगर-धामणगाव बीड महामार्गावरील पाटण सांगवी शिवारात बुधवारी (ता.सहा) सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली. यात एक ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भाजपकडून औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी; जलील म्हणाले, सुंदर शहर उद्धवस्त करु नका! 

एकनाथ गोल्हार असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आष्टी तालुक्यातील कापशी येथील रहिवासी एकनाथ गोल्हार हे सून व नातवासोबत दुचाकीने (एमएच १६ एयू ३४१९) धामणगाव येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी जात होते, तर नगर येथून बीडच्या दिशेने कार (एमएच ०६ एएफ २१९८) जात होती.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या 

दोन्ही वाहनांची सकाळी साडेअकराच्या सुमारास धामणगाव शिवारात समोरासमोर धडक होऊन त्यात एकनाथ गोल्हार हे जागीच ठार झाले. सून व नातू हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंभोरा कडा व आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नगर येथे पाठविले. दरम्यान अपघातानंतर कारचालक पळून गेला. या प्रकरणाचा तपास अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करित आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Man Died In Car Two Wheeler Accident Beed News