नरभक्षक बिबट्याची दहशत, आष्टी-पाथर्डी हद्दीवरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

4Leopard_1
4Leopard_1

आष्टी (जि.बीड) : पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचे बळी घेऊन दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याची आष्टी तालुक्याच्या हद्दीवरील गावांमध्येही चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. चार दिवसांपासून या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. या दरम्यान बिबट्या आपल्या भागात आल्याच्या चर्चेने आष्टी-पाथर्डी हद्दीवरील गावकरी धास्तावले आहेत. आष्टी तालुक्याला लागून असलेल्या पाथर्डी (जि.नगर) तालुक्यातील मढी, केळवंडी व शिरापूर या तीन गावांत नरभक्षक बिबट्याने तीन बालकांना पालकांसमोर उचलून नेत ठार केले आहेत.

त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. या नरभक्षक बिबट्याला जिवंत अथवा मृत पकडण्याचे आदेश वन विभागाने दिलेले आहेत. त्यामुळे बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून बिबटे पकडण्याचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांचे एक खास पथक यासाठी पाचारण करण्यात आले आहे. बिबट्याच्या शोधासाठी जळगाव, औरंगाबाद, नाशिक, नगरसह आष्टी तालुक्यातील वन विभागाचे कर्मचारीही प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, शिरापूरच्या घटनेला चार दिवस उलटले तरी बिबट्याचा शोध लागलेला नाही.

बिबट्याने उच्छाद मांडलेली पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी व शिरापूर ही गावे तालुक्याला लागून आहेत. गर्भगिरी डोंगररांगेतील घाटाच्या खालची ही गावे असून, घाटावर आष्टी तालुक्याचा भाग येतो. या भागात तालुक्यातील देऊळगाव घाट, अरणविहीरा, शेडाळा, मराठवाडी, मायंबा, सावरगाव, बांदखेल, केळ हा पट्टा येतो. दोन्ही भागातील अंतर अवघे सात-आठ किलोमीटरचे असून, बिबट्याच्या वावरासाठी ते अत्यंत सहज मानले जाते. त्यामुळे घाटाखालून पसार झालेला बिबट्या घाटावर म्हणजेच आष्टी तालुक्यातील गावांच्या परिसरात वावरत असल्याचे बोलले जात आहे. नरभक्षक बिबट्या परिसरात आल्याच्या चर्चेने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.


सोशल मीडियावरील छायाचित्रांनी भीतीत भर
मढी, वृद्धेश्वर या पाथर्डी तालुक्यातील देवस्थानांना लागूनच तालुक्यातील मायंबाचा परिसर आहे. या डोंगरपट्ट्यात बिबट्याचा संचार असल्याची चर्चा असून, सोशल मीडियावर काही छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. ती नेमकी आष्टी तालुक्यातीलच आहेत का, तसेच नरभक्षक बिबट्याचीच आहेत याची खातरजमा झालेली नसली तरी डोंगरपट्ट्यात त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. डोंगरावरील पवनचक्क्यांवर काम करणाऱ्या कामगारांनी ही छायाचित्रे काढल्याचा दाखला देण्यात येत असल्याने भीतीत भर पडली आहे.


नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, लवकरच त्याचा शोध घेण्यात यश येईल. आष्टी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात हा बिबट्या असल्याची चर्चा होत असली तरी त्यास अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या जेरबंद होईपर्यंत योग्य ती दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- श्याम शिरसाट, वन परीक्षेत्र अधिकारी, आष्टी


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com