esakal | लातुरात भावानेच काढला भावाचा काटा, खुनाच्या कबुलीनंतर मृतदेहाचा शोध | Latur Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Crime News

लातुरात भावानेच काढला भावाचा काटा, खुनाच्या कबुलीनंतर मृतदेहाचा शोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरूड (जि.लातूर) : सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तांदुळजा (ता. लातूर) (Latur) येथील एका युवकाचा त्याच्या भावाने मित्राच्या मदतीने खून करून त्याचा मृतदेह मांजरा नदी पात्रात फेकून दिल्याचे उघड झाले आहे. कुटुंबांची सर्व जमीन व मालमत्ता एकट्यालाच मिळावी, या हेतूने थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केल्याचे तपासात पुढे आले असून, खुनाची कबुली दिल्यानंतर येथील पोलिसांनी धाकट्या भावाच्या मृतदेहाचा नदीपात्रातील खोल पाण्यात शोध घेतला. बाभळगाव (ता. लातूर) येथील (Crime In Latur) पोलिस मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मंगळवारी (ता. १२) सकाळपासून सायंकाळपर्यंत हा शोध सुरू होता. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, की तांदुळजा येथील शेतकरी हरिभाऊ उद्धवराव गायकवाड (वय ५५) यांना विपीन हा थोरला तर दगडू ऊर्फ विशाल (वय १९) हा धाकटा मुलगा आहे. कुटुंबात १८ एकर जमीन असून, ही जमीन व कुटुंबांची सर्व मालमत्ता एकट्यालाच मिळावी म्हणून विपीन याने मित्र विकास ढाणे (रा. रांजणी, ता. कळंब) याच्या मदतीने सहा ऑक्टोबर रोजी रात्री शेतात झोपलेल्या विशालचा डोक्यात काठीने मारून खून केला. त्यानंतर दोघांनी विशालचा मृतदेह तटबोरगाव (ता. अंबाजोगाई) येथील पुलावरून मांजरा नदीपात्रात फेकून दिला.

हेही वाचा: मराठवाडाविरोधी सरकारची नौटंकी करू बंद, संभाजी निलंगेकरांचा इशारा

मात्र, मृतदेह न सापडल्यामुळे हरिभाऊ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी (ता. ११) विपीन गायकवाड व विकास ढाणे यांच्याविरुद्ध विशालचे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून मृतदेह फेकून दिलेल्या ठिकाणी शोध सुरू केला. दिवसभर बोट व अन्य साधनांच्या मदतीने कसून शोध घेतल्यानंतर सायंकाळी नदीकाठच्या झुडपात पोलिसांना मृतदेह सापडला. शोध कार्यात जमादार विष्णू चौगुले, बहादूर सय्यद, बाबासाहेब खोपे, चालक नाना जांबळे, विठ्ठल साठे, राजाभाऊ खोत, हनुमंत माने व कर्मचारी यांनी योगदान दिले.

माहिती देणाराच आरोपी

खून करून विपीन व त्याचा मित्र बिनधास्त फिरत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून विपीन यानेच धाकटा भाऊ विशाल अचानक बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी मिसिंगची नोंद घेऊन तपास सुरू केला. तपासात विपीनच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. यामुळे त्याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्याने मित्राच्या मदतीने भाऊ विशालचा खून करून त्याचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

loading image
go to top