'राष्ट्रपती' नंतर 'पंतप्रधाना' चा हालला पाळणा! मुलांचे ठेवली नावे | Osmanabad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News
'राष्ट्रपती' नंतर 'पंतप्रधाना' चा हालला पाळणा! मुलांचे ठेवली नावे

'राष्ट्रपती'नंतर 'पंतप्रधाना'चा हालला पाळणा! जाणून घ्या प्रकरण

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नावात काय, असे आपण सहजपणे म्हणतो. पण अलीकडच्या आधुनिक काळात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण अगदी हटके पद्धतीने केले जात आहे.  उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी पहिल्या मुलाचे नामकरण 'राष्ट्रपती' केल्याने चर्चेचा विषय ठरला होता. १९ जून २०२१ रोजी कोरोनामुळे राष्ट्रपतीचा पहिला वाढदिवस कुटुंबियांनी घरातच साधेपणाने साजरा केला होता. आता याच कुटुंबात १० नोव्हेंबरला दुसरा पुत्र जन्माला आला. आणि पिता दत्ताने यांनी केलेल्या संकल्पनेतून रविवारी (ता.२१) सासुरवाडीत मुस्ती (जि.सोलापूर) येथे मुलाचे नाव 'पंतप्रधान' ठेवण्याचा विधी संपन्न झाला. बदलत्या काळात मनुष्याची जीवनशैलीच बदलली आहे. राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे. पणजोबा, आजोबा, आजीचे नाव वाढवण्यासाठी प्रथाही अजून आहे. देशावरूनही नाव ठेवण्याची पद्धत आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले

भारत, भारतमाता, भारती अशी नावेही आहेत. उमरगा तालुक्यातही एका गावात मुलीचे नाव अमेरिका आहे. अशा अनेक नावीण्यपूर्ण कल्पना अनेकांना सूचतात. श्री.चौधरी सुशिक्षित बेकार आहेत. काही काळ त्यांनी गावाच्या प्रश्नांसाठी निवेदन देऊन प्रशासनाला कामाला लावण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी कुंटुबाचा प्रश्नही महत्त्वाचा असल्याने त्यांनी गावात शिकवणी सुरू केली. श्री. चौधरी यांना १९ जून २०२० मुलगा झाला. त्या बाळाच्या नामकरण कार्यक्रमात कल्पकतेने मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा निर्णय घेतला. सोलापूर येथे जन्मलेल्या बाळाचे महानगरपालिकेतून 'राष्ट्रपती दत्ता चौधरी' या नावाने जन्मप्रमाणपत्र आधार कार्डही काढून घेतले होते. दरम्यान राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबात मुलाचे नाव राष्ट्रपती असावे या उद्देशाने त्यांनी मुलाचे नामकरण राष्ट्रपती केले असावे. सर्वोच्चपदाचे नामकरण झाले म्हणजे त्याची गुणसंपन्नता प्रत्येकाच्या अंगी येईलच असे नसते. मात्र नावाच्या प्रतिमेतून त्या बालकाला प्रोत्साहन मिळावे, असे पालकांना अपेक्षित असते. पण त्यासाठी त्या बालकांचे स्वकर्तृत्वही तितकेच महत्वाचे असते. दरम्यान श्री. चौधरी व सौ. कविता चौधरी यांना १० नोव्हेंबरला दुसरा मुलगा झाला. आणि त्याचेही नाव हटके ठेवण्याचा निश्चय श्री. चौधरी यांनी केला आणि रविवारी सासुरवाडीत आई कविता व महिला भगिनींनी बाळाचे कान फुकूंन पंतप्रधान नाव ठेवले. दरम्यान जन्मस्थळ असलेल्या बोरामणी ग्रामपंचायतीकडे पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाच्या जन्मदाखल्यासाठी अर्ज करणार असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा: मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

मुलांना संस्कारक्षम करणार

माझ्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा जो उद्देश होता. तोच उद्देश दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवण्यासंदर्भात आहे. राष्ट्रपती नाव ठेवल्यावर समाजातून खूप वेगळ्या प्रतिक्रिया आल्या, राष्ट्रपती नावं ठेवल्यामुळे मुलगा राष्ट्रपती होईल का? पंतप्रधान ठेवल्याने पंतप्रधान होईल का? जर राष्ट्रपती हा मुलगा चांगल्या दिशेने जाईलच याची काय हमी ? तसे वागल्याने राष्ट्रपती नावचे अपमान होईल. असे प्रश्न केले तर काहींनी राष्ट्रपती नावात देशाभिमान आहे, खूप अप्रतिम विचार आहे. असे मत व्यक्त केले होते. मला देशाचा अभिमान आहे, म्हणून मी वडिलांचे नाव वाढवण्यापेक्षा,घटनात्मक राष्ट्रपती, पंतप्रधान नावे ठेवली. आता त्यांना चांगले संस्कार देण्याचे माझी जबाबदारी आहे. याच मला जाणीव आहे. असे मत श्री.चौधरी यांनी व्यक्त केले.

loading image
go to top