दुकान उघडताच पळविली पैशाची बॅग, चोरटा सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

शहराच्या मुख्य रस्त्यावरील शहीद भगतसिंग चौकातील साईबाबा लाईट हाऊस या मोबाईलच्या दुकानात शनिवारी (ता.30) सकाळी पावणेअकराच्या सुमारास दुकानमालकाने दुकान उघडताच चोरट्याने सराईतपणे पैशाची बॅग लंपास केली.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : शहराच्या मुख्य रस्त्यावरील शहीद भगतसिंग चौकातील साईबाबा लाईट हाऊस या मोबाईलच्या दुकानात शनिवारी (ता.30) सकाळी पावणेअकराच्या सुमारास दुकानमालकाने दुकान उघडताच चोरट्याने सराईतपणे पैशाची बॅग लंपास केली.

याप्रकरणी साईबाबा लाईट हाऊसचे मालक राजकुमार घनश्‍यामदास कटारिया यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याच्या विरोधात शनिवारी (ता.30) गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार कटारिया, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड यांचे शहरातील शहीद भगतसिंग चौकामध्ये साईबाबा लाईट हाऊस नावाने मोबाईलचे दुकान आहे. नित्यनेमाने ते शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले.

हेही वाचा ः कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह, बलात्कार की खून?

त्यांच्याजवळील पैशाची बॅग त्यांनी दुकान उघडून दुकानात ठेवली. काही कळण्याच्या आत समोरून व्यक्ती पळत आली. त्याने दुकानात ठेवलेली पैशाची बॅग उचलून पलायन केले. कटारिया यांनी आरडाओरड केली; परंतु क्षणार्धात चोरट्याने धूम ठोकली. बॅगमध्ये एक लाख पाच हजार रुपये, एक मोबाईल, वाहनांची कागदपत्रे असा ऐवज घेऊन चोरट्याने धूम ठोकली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 

पिंप्रीराजा येथील महिलेची
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

करमाड (जि.औरंगाबाद) : गावाजवळील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत उडी घेऊन एका चाळीसवर्षीय विधवा महिलेने जीवन संपवले. ही घटना शनिवारी (ता.30) सकाळी अकराच्या सुमारास पिंप्रीराजा (ता.औरंगाबाद) येथे उघडकीस आली. सुरेखा संजय मुठाळ (वय 40) असे आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे नाव आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता सुरेखा या कोणालाही न सांगता घराबाहेर पडल्या.

हेही वाचा ः ऊसताेडी हंगामाला झालीय सुरवात

त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. तथापि, त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. शेवटी, सकाळी अकरा वाजता गावाजवळील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
मागील काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या पिंप्रीराजा येथे आई-वडिलांसोबतच राहत होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक जावई असा परिवार आहे. मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते व रात्री उशिरापर्यंत याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात येईल, असे करमाड पोलिसांकडून सांगण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Steal Money Bag Sillod