व्यवस्थापकानेच पळविले 58 किलो सोन्याचे दागिने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नऊ वर्षांपासून कामाला असलेल्या व्यवस्थापकाने दोन वर्षांत एक दोन नव्हे, तर चक्क 58 किलो सोन्याचे दागिने चोरले.

औरंगाबाद -  वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नऊ वर्षांपासून कामाला असलेल्या व्यवस्थापकाने दोन वर्षांत एक दोन नव्हे, तर चक्क 58 किलो सोन्याचे दागिने चोरले. हेच दागिने नंतर व्यापाऱ्यांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यात व्यवस्थापकासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. 4) बेड्या ठोकल्या. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अंकुर अनंत राणे (मूळ गाव दापोली, जि. रत्नागिरी), राजेंद्र किसनलाल जैन (वय 29, रा. औरंगाबाद), लोकेश पवनकुमार जैन (21, रा. औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत. अंकुर राणे हा व्यवस्थापक म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून समर्थनगर भागात वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2018 या काळात मालक विश्वनाथ प्रकाश पेठे यांनी समर्थनगर येथील शाखेला भेट दिली. त्या वेळी त्यांनी सोन्याच्या साठ्याची पाहणी केली. दागिने कमी असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी राणेकडे चौकशी केली, त्या वेळी त्याने राजेंद्र जैन यांना दाखविण्यासाठी दागिने दिल्याचे सांगितले. तसेच, काही दिवसांत ते दागिने परत करणार असल्याचेही तो म्हणाला. त्यामुळे पेठे यांनी राणेवर विश्वास ठेवला. काही काळाने पेठे यांनी पुन्हा शाखेला भेट देत दागिन्यांबाबत राणेकडे चौकशी केली असता जैनने दागिने आणून दिले नाहीत, असे त्याने सांगितले. अखेर पेठे यांनी शहर पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार अंकुर, राजेंद्र व लोकेश यांना पोलिसांनी अटक केली. 

बनावट नोंदी 
चोरी लपविण्यासाठी अंकुर राणे याने दागिन्यांची बनावट व खोटी बिले तयार केली. या बिलाच्या खोट्या नोंदीही त्याने घेतल्या. त्या खऱ्या भासवून विश्‍वनाथ पेठे यांची फसवणूक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The manager stole 58 kg gold ornaments