मांजरा धरणातील मृतसाठा भरला, लातूरचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला

हरी तुगावकर
Friday, 21 August 2020

लातूर शहरासह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाचा मृत साठा भरला आहे. ही लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.

लातूर : लातूर शहरासह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाचा मृत साठा भरला आहे. ही लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यामुळे लातूर शहराचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला आहे.

लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. २०१८ मध्ये या धरणाचा मृतसाठा भरला होता. त्यानंतर २०१९ मध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणाचा मृतसाठाही भरला नव्हता. परतीच्या पावसाने थोडासा दिलासा दिला होता. काही प्रमाणात धरणात पाणी आले होते. त्यामुळे गेली वर्षभर त्यातून शहराला पाणी पुरवठा होवू शकला आहे. गेल्या वर्षीपासून शहराला दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात होता.

वाचा : आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट

पण यावर्षी जुलै महिन्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम धरणातील मृतसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून लातूर महापालिकेच्या वतीने शहराला सात दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. त्यात धरणात गेल्या काही दिवसापासून पाणी येत आहे.

त्यामुळे धरणा्चा मृतसाठा भरेल हे अपेक्षित होते. या धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ४७.१३० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. शुक्रवारी (ता.२१) धरणात ४८.१९२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. यात आता धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यातही वाढ होवू लागली आहे. शुक्रवारी  सकाळी धरणाच्या उपयुक्त साठा १.०६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती धरणाचे अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.

 

(संपादन : गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjara Dam Come Out Dead Storage Latur News