खूश खबर! मांजरा धरण भरले, पाण्याची आवक कायम राहिल्यास दरवाजे उघडणार

हरी तुगावकर
Tuesday, 27 October 2020

लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेले मांजरा धरण मंगळवारी (ता.२७) काठोकाठ भरले.

लातूर : लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेले मांजरा धरण मंगळवारी (ता.२७) काठोकाठ भरले. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास, आवक कायम राहिल्यास धरणातील पाणी पहिल्यांदा कालव्याद्वारे, आवश्यकता भासल्यास धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, एकशे बासष्ठ जनावरे दगावली

यंदा सुरवातीच्या काळात पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरण भरण्यास मदत झाली. आज हे धरण शंभर टक्के भरले.
मांजरा धरणाची पाणीपातळी ६४२.३७ मीटर असून उपयुक्त पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास, आवक कायम राहिल्यास धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतरही आवक वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. मांजरा नदी व धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्याकाठावरील शेतकरी, वस्ती करून राहिलेल्यांनी सावध राहावे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाने केले आहे.

दृष्टिक्षेपात धरण
प्रकल्पीय पाणीसाठा- २२४.०९ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा - १७६.९६ दलघमी
मृतसाठा- ४७.१३ दलघमी
पूर्ण संचय पातळी- ६४२.३७ मीटर

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjara Dam Full, Incoming Water Continue Then Gates Open Latur News