चारवर्षीय मन्नतने केले कलावंतीण दुर्ग, हरिश्‍चंद्रगड सर! 

मनीषा वाघमारे यांच्यासोबत मन्नत.
मनीषा वाघमारे यांच्यासोबत मन्नत.

औरंगाबाद - नुसतं छायाचित्र बघितलं तरी काळजात धस्स होतं असा कलावंतीण दुर्ग आणि हरिश्‍चंद्रगड सर करण्याची किमया औरंगाबादच्या चारवर्षीय मन्नत मिन्हास हिने साधलीय. जोखमीची मोहीम "जेम्स'च्या गोळ्या अन्‌ "लेझ चिप्स'च्या बदल्यात अवघ्या दोन तासांतच तिने फत्ते केली. शहरवासीयांना अभिमान वाटावा, अशीच ही कामगिरी आहे. 

मन्नतचा जन्म 22 सप्टेंबर 2014 चा. आई माधवी या गोगाबाबा टेकडीवर फिरायला जात. तीही आईच्या मागे लागून टेकडीवर जायची. त्यानंतर सहा महिन्यांत दहा-एक वेळा ती गोगाबाबा टेकडीवर चढली. याचदरम्यान तिची एव्हरेस्टवीर प्रा. मनीषा वाघमारे हिच्याशी गाठ पडली. मन्नत लिटल वूडस्‌ शाळेत "केजी'मध्ये शिकते. आईच्या मोबाईलमधील फोटो पाहून मलाही तिथे जायचे आहे, असे म्हणत ती या मोहिमेत सहभागी झाल्याचे मार्गदर्शक शशिकांत सिंग यांनी सांगितले. 

मन्नत गड चढताना तिची आई तिला मागे-पुढे हवी असते. चालत असताना ती नुसती प्रश्‍नांचा भडिमार करते, असा अनुभव तिच्या साथीदार प्रा. वाघमारे यांनी सांगितला. तिला जेम्सच्या गोळ्या आणि लेझ चिप्स फार आवडतात. चालत असताना खाऊ काय देणार? पुढे कुठे जायचे? मी बरोबर चालतेय ना? असे प्रश्‍न ती विचारत असते. प्रवास पूर्ण झाल्यावर तिचा पहिला प्रश्‍न असतो तो म्हणजे संपले का? पुढे नाही का जायचे? याचवेळी तिला आजुबाजूचे डोंगरही खुणावतात. तेव्हा तिकडे जाण्याचा संकल्पही ती बोलून दाखवते! पाहिले तरी कापरे भरावे असेच हे डोंगर आहेत. 

मोहिमेदरम्यान, इतर गिर्यारोहक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी सरसावतात, तेव्हा ती नटखट अदा सुरू करते. तिचा मूड तेव्हाच येतो जेव्हा मोहीम फत्ते झाल्यानंतर हाती तिरंगा येतो. हाती तिरंगा आल्यावर ती पोज देऊनच उभी राहते. महत्त्वाचा शिरस्ता असा की, सगळ्यात पुढे आपणच असावे असे तिला वाटते. तसेच तिला जिथे तिथे फोटो काढण्याचा मोह नाही. यामुळेच ती इतरांच्या आधी एक तास शिखरावर पोचलेली असते. दोन्ही गड सर करताना अपवाद वगळता अवघड वळणेही तिने लीलया पार केल्याने साथीदारांमध्ये ती कौतुकाचा विषय ठरली होती. 
 

मन्नतची मोहीम 
कलावंतीण दुर्ग : उंची 2300 फूट : 30 डिसेंबर 2018 
हरिश्‍चंद्रगड : उंची 4600 फूट : 27 जानेवारी 2019 
 

 स्केटिंग, सायकलिंग, पेंटिंग यासोबतच तिला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. तिच्या मनात येईल त्याप्रमाणे ती वागते. तिला स्वातंत्र्य आहे. कोणतीही बंधने नाहीत. योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने मी बिनधास्त आहे. 
- अवतारसिंग मिन्हास, मन्नतचे वडील 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com