उमरग्यात पाणीपुरवठ्याच्या अडचणी वाढल्या, ढिसाळ कारभाराचा शहरवासीयांना फटका

2NAL
2NAL

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना आहे. ही योग्य नियोजन नसल्याने, कुशल कामगाराची कमतरता, सातत्याने जलवाहिनीची गळती त्यात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे सुरळीत पाणीपुरवठ्याच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजने व्यतिरिक्त एका प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असुनही नियोजनाअभावी शहरवासीयांना वेळेत पाणी उपलब्ध होत नाही.

शहरातील बहुतांश भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. उमरगा शहराची लोकसंख्या जवळपास साठ हजारांपेक्षा अधिक आहे. अनेक भागात लोकवस्ती वाढली आहे. एप्रिल २०१२ मध्ये शहरासाठी माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा धरणातून कायमस्वरूपी योजना कार्यान्वित झाली. ऐन पाणीटंचाईच्या काळात ही योजना शहरवासियांसाठी वरदान ठरली असली तरी  निकृष्ठ कामांमुळे जलवाहिनी फुटीची सारखी चर्चा असते.



आता पुरेशा वीज समस्येचे ग्रहण
शहरासाठी कार्यान्वित झालेल्या कायमस्वरूपी योजनेचे पालिका प्रतिमहिना सात ते आठ लाख रुपये वीजबिल भरते. माकणी धरणातील उद्भव विहिरीवरील वीजपंपासाठी ३२५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र आहे. त्याला सास्तूरच्या उपकेंद्रातील एक्स्प्रेस फिडरवरून वीज जोडणी आहे. रात्रीच्या वेळी मात्र अधिक दाबाने वीज मिळते. त्यातुन शहरातील चार ठिकाणच्या जलकुंभात जवळपास वीस लाख लिटर पाणी मिळते. ते सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत काही मोजक्या भागातच संपते, अशा पद्धतीच्या नियोजनामुळे शहरात पाण्याची नेहमीची ओरड सुरू असताना मुख्याधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. दरम्यान सध्या माकणी योजनेचे पाणी खोळंबा झाल्याने बंद आहे.

खर्च अवाढव्य तरीही नियोजनाचा ताळमेळ नाही
पावसाळ्यातही वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड जुनी पेठ, हमीद नगर, गौतमनगर, औटी गल्ली, शिंदे गल्ली, महादेव गल्लीत तसेच शहराच्या उत्तरेकडील अनेक वस्तीतील नागरिकांची होत आहे. माकणी धरणात पाणी आहे, कोरेगाव तलाव पूर्ण भरलेला आहे. मात्र नळाला वेळेत पाणी मिळत नाही. पालिकेकडून पाणीपुरवठ्यासाठी महिनाकाठी दहा लाखापेक्षा अधिक खर्च होत असतानाही किमान तीन ते चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन होत नाही. दरम्यान शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी १९ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आहे. पालिकेने सरकारी दवाखान्याच्या परिसरात साडेसात लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचा प्रस्ताव तयार ठेवला आहे. मात्र निधी नसल्याने तो टेबलवरच पडून आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com