मराठा आरक्षणासाठी नवऱ्याची आत्महत्या; बायकोचा क्रांती चौकात ठिय्या

अतुल पाटील 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत.

केशव चौधरी हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातीलच शेलुद चारठा येथील होते. कुटुंबियांचे वीस वर्षांपासून शहरात वास्तव्य आहे. सध्या ते न्यू हनुमान नगरात राहत होते. केशव हे अशिक्षित असल्याने मातीकाम करायचे, तर त्यांची पत्नी धुणी-भांडी करून कुटुंब चालवायच्या. यातच दोघांनी मुलांना शिक्षण दिले. मुलगा रवीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले, मात्र पैशांअभावी तो मिस्त्री काम करु लागला. तर मुलगी दिव्याने छत्रपती महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेश घेतला आहे. शिक्षण थांबू नये म्हणून सीएच्या हाताखाली शिकाऊ उमेदवार म्हणून काम करायची. पंधरा दिवसांपासून ती कामावर जात होती.
 
पैशांअभावी मुलांना व्यवसाय नोकरी करावी लागते, त्याचे दुःख केशव यांना होते. ते नेहमी पत्नी जवळ बोलूनही दाखवत होते. त्यामुळेच ते मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हायचे. कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने अख्खे कुटुंबच क्रांती चौकात येऊन बसले. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत बसल्यानंतर समन्वयकांनी त्यांची समजूत काढल्याने कुटुंबीय घरी गेले.

तेव्हा असे घडले..
"माझी बहीण धुणीभांडी करण्यासाठी, रवी मिस्त्री कामासाठी, तर दिव्या नोकरीसाठी बाहेर पडली होती. भाऊजी एकटेच घरी होते. रवि दुपारी सव्वाबारा वाजता घरी आला तर, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना घाटीत  दाखल करण्यात आले." असे मेहुणे राजू ठाले यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maratha Kranti Morcha Husband suicides for Maratha reservation Wife participate in agitation