समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार: मराठा क्रांती मोर्चा 

राजेभाऊ मोगल 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बैठकीतील ठराव 
1) यापुढील प्रत्येक निवेदनात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच्या मागणीचा समावेश. 
2) क्रांती मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी आपले पक्ष, संघटना बाजूला ठेवून समाज म्हणूनच यावे. 
3) मोर्चाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात येणार. 
4) आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर दुकानदारी करून समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव शुक्रवारी (ता. 24) क्रांती मोर्चाच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या बांधवांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली मदत मिळवून देणे, क्रांतिदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान बांधवांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचा पाठपुरावा करणे, असे चार ठराव पारित करण्यात आले. 

मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या घडामोडींवर येथील उल्कानगरी परिसरात चिंतन बैठक झाली. यात कोपर्डी येथील भगिनीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाने विविध मार्ग पत्करत आंदोलने केली. याकडे सरकारकडून दुर्लक्ष झाल्यानेच आंदोलने वेगळ्या वळणावर गेली आहेत. तसेच शेतकरी संपाप्रमाणे क्रांती मोर्चामध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप येथे करण्यात आला. शिवाय, क्रांती मोर्चाच्या नावावर दुकानदारी करून समाजाशी गद्दारी करण्याचा प्रकारही समोर आल्याची चर्चा येथे झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा हेच नाव कायम ठेवणे यासह प्रत्येक मोर्चात सहभागी असलेल्या समन्वयकांनी, बांधवांनी चार ठराव मांडले. ते सर्वानुमते पारित करण्यात आले. ज्येष्ठ समन्वयकांनी मोर्चाची आगामी दिशा कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. 

बैठकीतील ठराव 
1) यापुढील प्रत्येक निवेदनात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच्या मागणीचा समावेश. 
2) क्रांती मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी आपले पक्ष, संघटना बाजूला ठेवून समाज म्हणूनच यावे. 
3) मोर्चाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात येणार. 
4) आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

Web Title: Maratha Kranti Morcha meeting in Aurangabad