Maratha Kranti Morcha : संरक्षण नसेल तर उद्योग हलवू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पोलिस आले; पण सुरक्षा नाही 
हल्ले होत असताना पोलिसांना फोन केले गेले. अनेक ठिकाणी पोलिस तासाभराने पोचले. आलेले पोलिसही कोणतीच सुरक्षा देऊ शकले नाहीत. घटना घडल्यावर सूत्रे हलली तर उपयोग काय, असा प्रश्‍नही उद्योजकांनी केला. 

औरंगाबाद - ‘उद्योग क्षेत्रात जातपात न पाहता क्षमता पाहून नोकऱ्या दिल्या जातात. अशा परिस्थितीत उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी कोणतेही संरक्षण सरकार देऊ शकणार नसेल तर आम्हाला इथून गुंतवणूक हलवण्याचा विचार करावा लागेल,’ असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला. औद्योगिक संघटनांनी गुरुवारी रात्री तातडीने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा निषेध केला. 

प्रत्येकवेळी उद्योगांना सॉफ्ट टार्गेट केले जाते. दरवेळी उद्योग बंद ठेवणे शक्‍य नसते. उद्योगांचे होणारे नुकसान आता सहनशीलतेपलीकडे गेले आहे. सरकारने नोकऱ्या दिल्या; तर त्या मर्यादितच असतील. उलट उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते आणि अशाप्रकारे नोकऱ्या देणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात असेल तर गुंतवणूक करायची की नाही, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा ‘एनआयपीएम’चे उपाध्यक्ष सतीश देशपांडे यांनी दिला. दरम्यान, भीतीमुळे शुक्रवारी काही कंपन्या बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रसाद कोकीळ, कमलेश धूत, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, संदीप नागोरी, नितीन गुप्ता, अनुराग कल्याणी, अजय गांधी, शिवप्रसाद जाजू उपस्थित होते.

पोलिस आले; पण सुरक्षा नाही 
हल्ले होत असताना पोलिसांना फोन केले गेले. अनेक ठिकाणी पोलिस तासाभराने पोचले. आलेले पोलिसही कोणतीच सुरक्षा देऊ शकले नाहीत. घटना घडल्यावर सूत्रे हलली तर उपयोग काय, असा प्रश्‍नही उद्योजकांनी केला. 

बहुराष्ट्रीय कंपन्या टार्गेट
सीमेन्स, इंड्युरन्स, व्हेरॉक, नहार इन्फोटेक, आकांक्षा पॅकेजिंग, एनआरबी, शिंडलेर, कॅनपॅक यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह तब्बल साठ कंपन्यांवर हल्ला झाल्याची माहिती ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.  

Web Title: Maratha Kranti Morcha Move the industry if there is no protection in aurangabad