खासदार, आमदारांच्या घरासमोर आता आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक पवित्र्यात

हरी तुगावकर
Sunday, 13 September 2020

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण कायम ठेवावे या करीता खासदारांनी बाजू मांडावी या करीता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. यातूनच आता खासदार, आमदार, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

लातूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण कायम ठेवावे या करीता खासदारांनी बाजू मांडावी या करीता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. यातूनच आता खासदार, आमदार, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी (ता.१३) येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.

रुग्णांकडून बिलाच्या नावावर लूट सुरु, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार कधी थांबणार?

या संदर्भात मराठा समाजाची रविवारी (ता.१३) येथे बैठक झाली. ही स्थगिती उठवण्यासाठी व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील सर्व खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी व त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करून घ्यावा.

राज्य सरकारने देखील केंद्र सरकारला आरक्षणासाठी पाठपुरावा करावा व स्थगिती लवकर उठवावी या करीता ता.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर ता.१७ सप्टेंबर रोजी बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या तसेच लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर येथील आमदारांच्या घरासमोर निदर्शन करून आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनामुळे अबंड शहरात दोन व्यापारी संघटनात जुंपली !

उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गात शोभीवंत झाडांच्या कुंड्या
आपलं लातूर हरीत लातूर, आपलं लातूर स्वच्छ लातूर या मोहीमेअंतर्गत ग्रीन लातूर वृक्ष टीम शहरात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपनात कार्यरत आहे. मागील ४६८ दिवसांत पस्तीस हजारांपेक्षा जास्त लहान मोठी झाडे लावून, त्यांचे संगोपन करुन वेगळा विक्रम या टीमने प्रस्थापित केला आहे. आता शहरातील शिवाजी चौकातील उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गात ९० शोभीवंत झाडांच्या कुंड्या या टीमच्या वतीने ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अभिजित देशमुख, संगम हायटेकनर्सरीचे संगमेश्वर बोमणे, अतुल मेटल वर्कचे अभिनव शहा, विपुल शहा, अतुल शहा, मुरारी पारीख, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वैशाली लोंढे यादव हे उपस्थित होते. ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या कार्याचे कौतूक करुन महापालिका या कामासाठी सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन श्री.टेकाळे यांनी यावेळी दिले. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल व आपलं लातूर सुंदर लातूर दिसेल असे मत श्री. देशमुख यानी व्यक्त केले.

संपादन -गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Will Do Agitation Before MP, Ministers