परळीत पुन्हा मराठा आरक्षणासाठी एल्गार, तहसीलसमोर बेमुदत आंदोलन सुरु

प्रविण फुटके
Thursday, 8 October 2020

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलपर्यंत गुरूवारी (ता.आठ) मोर्चा काढण्यात आला.

परळी वैजनाथ (जि.बीड) : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. गुरूवारी (ता.आठ) परळी वैजनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.आठ) सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरवात झाली. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणा देत मोर्चा आझाद चौकमार्गे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला.

जायकवाडी धरणातून विसर्ग बंद, गोदावरी पात्रात एकतीस दिवस सोडले पाणी

या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर आंदोलकांनी या प्रांगणात ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा रद्द करा, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवा, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या जागेवरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. या मोर्चाला तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha's Undefinte Strike Starts Before Tahsil Office Beed News