शासकीय आदेशाची मराठा महासंघाकडून होळी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ बरखास्त केल्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या आदेशाचे मराठा महासंघाकडून मंगळवारी (ता.दहा) गांधी चमन येथे होळी करण्यात आली आहे.

जालना : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या आदेशाचे मराठा महासंघाकडून मंगळवारी (ता.दहा) गांधी चमन येथे होळी करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मध्यमातून मराठा तरूणांना उद्योगासाठी कर्ज दिले जात होते. मात्र, शासनाने हे महामंडळ व या महामंडळावर अध्यक्ष असलेले नरेंद्र पाटील यांची नियुक्ती बरखास्त करण्याचे आदेश काढले आहे.

केळीच्या बागेत झेंडू फुलाचे आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने साधली समृद्धी! विजयादशमीला मिळाले एक लाखाचे उत्पन्न

त्यामुळे मराठा समाजात नाराजीचा सुर आहे. दरम्यान मराठा महासंघाच्या वतीने शासनाच्या या आदेशाची शहरातील गांधी चमन येथे मंगळवारी होळी करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ, संतोष कऱ्हाळे, सुभाष चव्हाण, अॅड. शैलेश देशमुख, मुरली सुरवासे, बाळासाहेब देशमुख, शुभम टेकाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे, तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Mahasangh Burned Annasaheb Patil Development Corporation Order