केळीच्या बागेत झेंडू फुलाचे आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने साधली समृद्धी! विजयादशमीला मिळाले एक लाखाचे उत्पन्न

अविनाश काळे
Tuesday, 10 November 2020

निसर्गाचा अधून-मधून बसणारा फटका शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थगणीत बिघडवत आहे. अशा स्थितीत पारंपारिक पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : निसर्गाचा अधून-मधून बसणारा फटका शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थगणीत बिघडवत आहे. अशा स्थितीत पारंपारिक पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. परंतू उपलब्ध क्षेत्रापैकी किमान तीस टक्के शेती आधुनिक पिक पद्धतीने केली तर त्यातून उत्पन्न चांगले मिळू शकते. ती किमया मुरूम (ता.उमरगा) येथील शेतकरी शेखर मुदकण्णा व मनिष मुदकण्णा या बंधूंनी करून दाखविली आहे. दोन एकर केळीच्या क्षेत्रात झेंडू फुलाची लागवड करून चार महिन्यात किमान चार लाखाचे उत्पन्न पक्के केले आहे.

एकोणीस नोव्हेंबरला ठरणार उदगीर, जळकोट तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण

उमरगा तालुक्यात खरिप पिकाची पारंपारिक शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असते. त्यानंतर रब्बी पिकाचे क्षेत्र येते. ऊसाची लागवडही बऱ्या प्रमाणात असते. अलीकडच्या काळात झेंडू फुल शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी ते क्षेत्र अगदी मर्यादितच आहे. काही दहा-पाच मोजक्याच शेतकऱ्यांनी गुलाब आणि जरबेरा फुलशेती सुरु केली आहे. मात्र यंदा अतिवृष्टीने फुलशेतीला फटका बसला आणि दसऱ्यात झेंडूचे उत्पन्न अगदी कमी निघाले मात्र भाव चांगला मिळाला. आता मोजक्या क्षेत्रात असलेल्या फुलशेतीतील झेंडूला दिवाळीच्या सणात चांगले मार्केट मिळेल, अशी स्थिती आहे.

आंतरपिक झेंडू फुल शेतीने दिला दिलासा
मुरुम शिवारात शेखर मुदकण्णा यांची शेती आहे, त्यांचे बंधू मनिष एमएस्सी (अग्री)चे शिक्षण घेऊन व्यवसायाबरोबरच शेतीत नव-नवीन प्रयोग करतात. त्यांनी केळीच्या बागेत झेंडू फुलाचे आंतरपिक घेण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात पाच फुट अंतरावर केळीची लागवड केली. ऑगस्ट महिन्यात आंतरपिक म्हणून सहा हजार झेंडूची रोप लागवड केली. रानात शेणखताचा अधिक वापर करण्यात आला. वेळेवर देखरेख करण्यात आली, निसर्गाचीही साथ मिळाली आणि झेंडू बहरला. दसऱ्याला पहिली तोड झाल्यानंतर २२ क्विंटलचे उत्पन्न मिळाले. पहिल्यांदाच झेंडू शेती केल्याने बाजारपेठेतील दराचा नेमका अंदाज मिळाला नाही.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

सोलापूरला वीस रुपये किलो तर उस्मानाबादच्या मार्केटमध्ये पन्नास ते सत्तर रुपये किलोचा दर मिळाला, तरी एक लाख पाच हजार रुपये मिळाले. आता दिवाळीच्या दुसऱ्या तोडीला किमान तीस क्विंटल उत्पन्न मिळेल असा बहर झेंडूला आला आहे. दिवाळी सणाला झेंडूची मागणी अधिक असते, दर चांगला मिळेल अशी स्थिती आहे, यातून तीन लाखाचे उत्पन्न मिळेल असा आशावाद श्री. मुदकण्णा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मंगळवारी (ता.दहा) तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव, मुरुमचे मंडळ कृषी अधिकारी एस.बी. जाधव, कृषी सहाय्यक प्रशांत जाधव यांनी झेंडू फुलशेतीची पाहणी करून शेतकऱ्याच्या यशस्वी प्रयत्नाचे कौतूक केले.
 

 

केळीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच झेंडूचे आंतरपिक घेण्याचा निर्णय घेतला. केळी आणि झेंडू लागवडीचा खर्च एक लाख तीस हजार आला. झेंडूच्या पहिल्या तोडीतून एक लाख मिळाले आता दिवाळीसाठी दुसऱ्या तोडीतून आणि तुलशी विवाह समारंभासाठी विक्रीतून किमान तीन लाखाचे उत्पन्न मिळेल. केळीचा गोडवाही येणाऱ्या काळात मिळेल. शेतकऱ्यानी ऊसाचे उत्पन्न घ्यावे, परंतू त्यातील कांही क्षेत्रात उत्पन्न देणाऱ्या आधुनिक शेतीची निवड करायला हवी.
- शेखर मुदकण्णा, मुरुम
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana With Marigold Flowers Bring Prosperity Into Farmer Life Umarga