Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा अव्वल; आतापर्यंत दिली एवढी प्रमाणपत्रे

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलकांनी मुंबईकडे कुच केली आहे.
Collector office Beed
Collector office BeedSakal

बीड - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलकांनी मुंबईकडे कुच केली आहे. त्यामुळे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदींचे वारसांना प्रमापत्रांचे वाटप सध्या वेगात सुरु आहे. यात मराठवाडा विभागात प्रमाणपत्र देण्यात बीड जिल्हा अव्वल ठरला आहे.

मराठवाडा विभागात वाटप झालेल्य एकूण कुणबी प्रमाणपत्रांच्या निम्मे प्रमाणपत्रे एकट्या बीड जिल्ह्यात वाटप झाली आहेत हे विशेष. मराठवाड्यात आतापर्यंत २१ हजार ३१ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. तर, एकट्या बीड जिल्ह्यात १० हजार २६५ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वाधिक मराठा - कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जातीच्या नोंदीही बीड जिल्ह्यातच आढळल्या आहेत. मराठा समाजाला सरकसट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे अमरण उपोषण सुरु केल्यानंतर शासनाने मराठा - कुणबी, कुणबी - मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे.

निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमूना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (गृह), अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून जिल्ह्यात २३ लाख ८१ हजार ५५३ दस्तावेजांची तपासणी केली.

यामध्ये १३ हजार १२८ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमणापत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचा निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह मुंबईकडे उपोषणासाठी निघाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रीया गतीने सुरु केली आहे.

या नोंदींच्या अधारे संबंधीत कुटूंबियांच्या वारसांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २६५ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. महा ई सेवा केंद्रांवरुन देखील सदर प्रमाणपत्र वाटप केले जात आहे.

जिल्हानिहाय प्रमाणपत्रांचे वाटप (२३ जानेवारीपर्यंत)

बीड - १०२६५

छत्रपती संभाजीनगर - १७२०

जालना - २६११

परभणी - २६८१

हिंगोली - ९३

नांदेड - ३८४

लातूर - २३१

धाराशिव - ३०४६

एकूण - २१०३१

पूर्ण कागदपत्रांसह मागणी करताच वारसांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे १९६७ पूर्वीच्या दस्तऐवजांत कुणबी नोंदी असतील त्यांनी संबंधीत तहसिलदारांकडे जमा करावेत. नोंदी असलेल्या प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल. मराठवाड्यात सर्वाधिक प्रमाणपत्र जिल्ह्यात वाटप झाले.

- दीपा मुधोळ - मुंडे, जिल्हाधिकारी, बीड

कुणबी नोंदीतही बीडच अव्वल

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ३२ हजार ९१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यात सर्वाधिक १३ हजार १२८ नोंदी एकट्या बीड जिल्ह्यात आढळल्या आहेत. तर, छत्रपती संभाजी नगरमध्ये ४४७४, जालना जिल्ह्यात ३३१८, परभणीत २८९१, हिंगोली जिल्ह्यात ४०२८, नांदेडमध्ये १७२८, लातूर जिल्ह्यात ९०१ तर धाराशिव जिल्ह्यात १६०३ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com