मराठा समाजातर्फे आता आक्रमक मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

तुळजापूर - राज्यभरात भव्य क्रांती मूक मोर्चे काढूनही सरकारचे मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष आहे. सरकारला जागे करण्यासाठी आता गनिमी कावा पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव सकल मराठा समाज समन्वयकांनी येथे बुधवारी घेतलेल्या राज्यस्तरीय बैठकीत केला. येत्या 29 रोजी येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळाने या आंदोलनाची सुरवात करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या सभागृहात ही बैठक झाली. राज्यभरातील समन्वयक उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना किशोर पवार म्हणाले, ""मराठा समाजासाठी आरक्षण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी, ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती आदी मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे राज्यभरात 58 क्रांती मूक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आश्‍वासने मिळाली, काही घोषणा झाल्या. ठोस असे काही झाले नाही. मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने आता आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Web Title: maratha society rally