परळीच्या भूमितून मराठा आरक्षण आंदोलनाचे दुसरे पर्व

Parli
Parli

परळी वैजनाथ (जि. बीड) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने सुरू केलेली मेगा नोकर भरती स्थगित करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकर्‍यांचे व बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत अशा प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 18 जुलैपासून सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला सोमवारी (ता.30) बरोबर तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. तेरा दिवस जावूनही कार्यकर्ते आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. परळीच्या भूमितून पेटलेला आरक्षणाचा वनवा राज्यभर पसरला आहे.

परळी शहराच्या इतिहासात एखाद्या प्रश्नावर झालेले हे पहिलेच आंदोलन आहे. हे आंदोलन आणखीन किती दिवस चालेल हे सांगणे कठीण आहे. मराठा समाजाचे राज्यभर सध्या सुरू असलेल्या ठोक आंदोलनाची सुरूवात परळीतून झाली आहे. 
गेल्या 18 जुलैला परळी शहरातून निघालेला राज्यातल्या पहिल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रूपांतर आंदोलनात झाले. शहरातील शिवाजी चौकातून हा मोर्चा निघाला. राज्यभरातून कार्यकर्ते या  ठोक मोर्चात सहभागी झाले होते. 58 मूक मोर्चे काढूनही सरकारने मागण्यांकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप करून सकल मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला.

तुळजापूर येथे गेल्या महिन्यात आरक्षणाचा गोंधळ घालून परळीतून राज्यातला पहिला ठोक मोर्चा काढण्याचे ठरले. हा मोर्चा उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळीवर आंदोलन करूनही याची दखल सरकार घेत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या मोर्चापुढे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय होवून मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते या प्रांगणात ठिय्या आंदोलनास बसले. राज्यभरातून कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. ठिय्या आंदोलन करण्यास तरूण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा पाठींबा या आंदोलनाला मिळाला. आंदोलनाची चर्चा राज्यभर सुरू झाल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येथे येवू लागले. महिला व तरूणांची संख्या लक्षणिय आहे. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची जेवणाची सोय परळीतील कार्यकर्त्यांनी केली. यासाठी प्रत्येकाने जमेल ती मदत दिली. त्यामुळे अकराव्या दिवशीही हजारो कार्यकर्ते जेवणाचा लाभ घेत आहेत. पुढे विविध पक्ष, संघटना व त्यांच्या नेत्यांनी आंदोलनाला भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपला पाठींबा जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला. स्थानिक स्वराज्य संस्थाही या आंदोलनाला पाठींबा देत पाठींब्याची प्रत या ठिकाणी आणून देत आहेत. या आंदोलनाने परळी शहराचे नाव पुन्हा राज्यभर चर्चेला गेले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने मेगा नोकर भरती थांबवावी व समाजाच्या इतर मागण्या सोडवाव्यात या मागण्या मान्य होईपर्यंत परळी सोडायची नाही असा निर्णय उपस्थितांनी घेतला. 

प्रसार माध्यमातून येथील आंदोलनाच्या बातम्या सर्वत्र जावू लागल्याने परळी या आंदोलनाची प्रमुख केंद्र बनली. या आंदोलनामुळे पोलिस व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलिस अधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांना या आंदोलनादरम्यान बरेच दिवस येथे तळ ठोकून रहावे लागत आहे. या आंदोलनाचे लोन राज्यात सर्वत्र पसरले. ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोर्चे, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन सुरू झाले. सरकारबरोबर चर्चा करायची नाही, चर्चेसाठी कुणी जायचेच नाही, सरकारच्या प्रतिनिधींनीच आंदोलनस्थळी आपली भूमिका मांडवी असे संयोजकांनी जाहीर केले. दरम्यान, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्यामार्फत सरकारने तीन वेळा पत्र देवून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या पत्रात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. न्यायालयात आरक्षणाबाबत भक्कमपणे बाजू  मांडू, मराठा समाजाला आरक्षण मिळेल या तत्वावर मेगा नोकर भरतीत सोळा टक्के राखीव जागा ठेवल्या जातील व मराठा समाजावर कोणताही अन्याय होणार नाही असे स्पष्टपणे या पत्रात नमूद केले. परंतु राज्य सरकारने दिलेल्या या पत्रावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. नोकर भरतीला स्थगिती आणि आरक्षण या आपल्या मागणीवर कार्यकर्ते ठाम राहिल्याने सकल मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन येथे सुरूच आहे.

सलग तेरा दिवस चालणारे शहराच्या इतिहासातील हे पहिलेच आंदोलन आहे. यामुळे परळीचे नाव सध्या राज्यभर गाजते आहे. या आंदोलनाची सरकारही गंभीर दखल घ्यावी लागत आहे. सरकार हलवण्याची ताकद या आंदोलनाने निर्माण केली आहे. गेल्या शुक्रवारी (ता.27) आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर आपला तीव्र आक्रोश व्यक्त करत सरकारचा दहावा घालून 110 कार्यकर्त्यांनी मुंडन केले. मुंडनानंतर जमा झालेले केस मुख्यमंत्र्यांना निषेध म्हणून पाठवले.

हे ठिय्या आंदोलन मराठा समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. या आंदोलनाच्या लढ्याला नेता नाही की कुणी पुढारी. समाजातील प्रत्येक घटक यासाठी लढतो आहे. हे या आंदोलनाचे वैशिष्टये आहे. पुढाकार घेणार्‍यात तरूणांची, महिलांची संख्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com