मराठा आरक्षणासाठी तरुणाची नदीत आत्महत्या (व्हिडिओ)

अतुल पाटील
सोमवार, 23 जुलै 2018

कायगाव टोका येथील नव्या पुलावरुन उडी मारली होती. जुन्या पुलापर्यंत गटांगळ्या खात हा तरुण वाहत गेला होता. काकासाहेब शिंदे या तरुणाला बाहेर काढले असून प्रकृती मात्र गंभीर होती.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. 

कायगाव टोका येथील नव्या पुलावरुन उडी मारली होती. जुन्या पुलापर्यंत गटांगळ्या खात हा तरुण वाहत गेला होता. काकासाहेब शिंदे या तरुणाला बाहेर काढले असून प्रकृती मात्र गंभीर होती, मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी गंगापुर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. निवेदनात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. 

आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतून काकासाहेब यांना उपचारासाठी कायगाव टोका येथून गंगापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडे त्यांना रवाना केले. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
कानडगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने कायगाव टोका येथून गोदावरी पात्रात जलसमाधी घेतली असून आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भुमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha youth suicide for maratha reservation in Aurangabad