...तर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी बाराशे कोटी 

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे पैसे नसले तरी तरतूद केलेले 73 कोटी रुपये पडून आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी चारशे कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले असून, महामंडळाच्या योजना यशस्वी झाल्यास याची मर्यादा बाराशे कोटी रुपयांपर्यंत नेण्याची शासनाची तयारी आहे, अशी माहिती योजनांचे निरिक्षक किरण पटवर्धन यांची येथे दिली. 

महामंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. 17) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पटवर्धन म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनुभवाची जोड देऊन चांगले व्यावसायिक तयार व्हावेत. यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात वैयक्‍तिक कर्ज व्याज परतावा, गटकर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजनांचा समावेश आहे. व्यवसायासाठी बॅंकेकडून 10 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत घेतलेल्या कर्ज रकमेवरून 12 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत पाच वर्षांपर्यंत महामंडळ व्याज परतावा करेल. यासाठी सेवा योजना कार्यालयाची नोंदणी आवश्‍यक आहे. सेवा योजनेचा युझर आयडी व पासवर्ड वापरून महामंडळाचा ऑनलाइन फॉर्म भरता येईल. 

तिन्ही योजनांसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळाला भेट देऊन उद्योजकतावर नोंदणी करावी. आमच्याकडून अर्जदारांना मंजुरी पत्र मिळाल्यानंतर त्यांनी बॅंकेशी संपर्क साधायचा आहे. 

उमेदवारांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्यस्तरावर व्यावसायिक व बॅंकिंगमधील तज्ज्ञांना सहभागी करून घेत तांत्रिक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती ता. 29 मेपर्यंत राज्यभरातील महत्त्वाच्या शहरांत दौरे करेल. यावेळी लाभार्थ्यांचे स्टेटस तपासणे, योजनांची माहिती, प्रशिक्षणाची गरज, उमेदवारास कशा पद्धतीचा बेस आहे, सल्ला देणे, ही कामे करण्यात येणार असल्याचे श्री. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

यावेळी योजनांचे सल्लागार नीलेश लेले, तांत्रिक मार्गदर्शक अनिल गायकवाड, विशाल मोरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक निशांत सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक प्रवीण आगवण, गणेश दराडे उपस्थित होते.

Web Title: marathi news Annasaheb Patil Financial Corporation